काल मध्यरात्रीपासून मुंबई आणि नजिकच्या परिसरांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं असून काही ठिकाणी घराच्या भितीं कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. या पावसाचा फटका मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या लोकल सेवेलाही बसला. सकाळपासून शहरात पावसाने उसंत घेतल्यानंतर आता लोकल सेवाही हळुहळु पूर्वपदावर यायला लागली आहे.
ADVERTISEMENT
रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावर ठाण्याच्या पुढची सेवा बंद करण्यात आली होती. परंतू पावसाने उसंत घेतल्यानंतर हळुहळु ही सेवा सुरु करण्यात आली आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर मानखुर्द ते पनवेल दरम्यान सेवा सुरु असून या मार्गावरील वडाळा, चुनाभट्टी या भागात अजुनही ट्र्रॅकवर पावसाचं पाणी साचलेलं आहे.
मध्य रेल्वे मार्गावर दादर, परळ, सायन, कुर्ला या भागात मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही या पावसाचा परिणाम झालेला आहे. या गाड्यांबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलेली माहिती दिली आहे.
दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावरही विस्कळीत झालेली लोकल सेवा आता पूर्वपदावर येताना दिसत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मात्र या पावसाचा परिणाम झालाय. काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान काल मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळे दादर, लालबाग, परळ, दक्षिण मुंबईतील महत्वाची ठिकाणं, भांडूप, चिंचपोकळी या भागांमध्ये पाणी साचलेलं पहायला मिळालं. काही ठिकाणी परिस्थिती इतकी भयावह होती की रस्त्यांना अक्षरशः नदीचं रुप आलंय. अनेक चारचाकी वाहनंही या पावसाच्या पाण्यात अडकून बंद पडली आहेत. पुढचे ३ तास शहरात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन महापालिकेने केलं आहे.
ADVERTISEMENT