महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आपल्या भेटीदरम्यानचा एक फोटो फडणवीसांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. आपली भेट ही सदिच्छा भेट असली तरीही या भेटीनंतर राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवारांनी मोलाची भूमिका बजावली. मध्यंतरीच्या काळात शस्त्रक्रीया झाल्यानंतर शरद पवार महिनाभर सक्रीय राजकारणातून दूर होते. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा लोकांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. शस्त्रक्रीयेनंतर फडणवीस यांनी पहिल्यांदाच पवारांची भेट घेतली आहे.
२०१९ विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार हा सामना चांगलाच रंगला होता. अनेक जाहीर सभांमध्ये शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर नाव घेत टीका केली होती, ज्याला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. यानंतर अजित पवारांच्या सहाय्याने राज्यात ३ दिवसांचं सरकार बसवल्यावेळीही पवार-फडणवीस संघर्ष गाजला होता. सोमवारी मुंबईत मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारच्या धोरणावर टीका केल्यानंतर फडणवीसांनी तात्काळ पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.
ADVERTISEMENT