शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहीलेल्या पत्रावरुन राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सरनाईकांच्या पत्रानंतर राज्यात सेना-भाजप युतीची चर्चा रंगायला लागल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रीया दिली आहे.
ADVERTISEMENT
“भारतीय जनता पार्टी स्वबळावरच लढते आहे. प्रश्न त्यांचाच आहे, आता त्यांनीच आपापसात ठरवायचं आहे की कोणाला जोडे मारायचे आणि कोणाला हार घालायचे. कोणी कोणाच्या सोबत जायचं हा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. आम्हाला त्यावर फारकाही बोलायचं नाही. आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही काम करत राहू.” देवेंद्र फडणवीस पुण्यात एका लग्नसोहळ्याला उपस्थित असताना पत्रकारांशी बोलत होते.
शिवसेना-भाजपने एकत्र यावं अशी अनेकांची इच्छा असू शकते. आमचं मत स्पष्ट आहे, हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. सरनाईकांनी तो त्यांच्या पक्ष प्रमुखांना लिहीला आहे. भाजपच एक पक्क ठरलंय की आम्ही सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करतोय आणि जनतेचे प्रश्न आम्ही समोर मांडतोय. मागच्या वेळी सिंगल लार्जेस्ट पार्टी आम्ही होतो पण आमचं बहुमत नव्हतं. आम्ही युतीत लढलो, पण येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ असा आम्हाला विश्वास आहे असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सरनाईकांनी लिहीलेल्या पत्रावर मत मांडलं आहे. “युतीसारख्या कोणत्याही विषयावर आम्ही काही बोललो की लगेच सामना मध्ये अग्रलेख येतो की सरकार नसल्यामुळे यांच्या पोटात दुखतंय. त्यामुळे या विषयावर आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही. परंतू उद्धवजींनी विचार केला तर आमचे नेते वर बसलेत ते विचार विचार करतील. गेले १८ महिने आम्ही हीच गोष्ट घसा कोरडा होईपर्यंत सांगत होतो. बाळासाहेबांनी ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून शिवसेना बसली”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
बाळासाहेबांनी अल्पसंख्यांकांचं राजकारण केलं नाही. मान खाली गेली नाही पाहिजे असं शिवसेनेचं राजकारण होतं. पण आता तिच लोकं टिपू सुलतानाच्या जयंती साजऱ्या करायला लागली आहेत असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सेनेला टोला लगावला.
ADVERTISEMENT