मुंबई : शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तडीपार करून तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवी केला आहे. तसेच आपल्याकडे 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला. वाशीतील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मढवी बोलत होते. ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही यावेळी उपस्थित होते.
ADVERTISEMENT
यावेळी बोलताना मढवी म्हणाले, माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची हालचाल नवी मुंबई पोलिसांनी सुरू केली असल्याची माहिती मिळाली. याबाबत मी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांना भेटण्यासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी मला थेट शिंदे गटात सामील होण्यास सांगितले. शिवाय जाताना विजय चौगुले यांच्या माध्यमातूनच जा, जास्त आढेवेढे घेऊ नका, नाही तर तुम्हाला तडीपार करून तुमचा एन्काऊंटर करू, असाही दम त्यांनी दिला असल्याचा आरोप मढवी यांनी केला.
एकनाथ शिंदे यांनीही धमकावले :
यावेळी बोलताना मढवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला धमकावले असल्याचा दावा केला. “तुम्ही मातोश्रीवर जाऊ नका, माझ्याकडे या, माझ्याकडे आल्यानंतर तुमचे आणि कार्यकर्त्यांचे भलेच होणार आहे. तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. तुम्ही मातोश्रीवर जाण्याचे थांबवा”, असा दम मला शिंदे यांनी फोनवरून दिला होता, असाही आरोप त्यांनी केला
पोलिसांकडून होत असलेल्या या छळवणुकीमुळे मी आणि माझे कुटुंब प्रचंड तणावाखाली आहे, असेही मढवी यावेळी म्हणाले. दरम्यान, मढवी यांच्यावर मागील काही काळात विविध स्वरूपाचे 13 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. या भीतीतूनच त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केल्याचे दावा पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केलाआहे.
ADVERTISEMENT