Maharashtra Budget Session Live : 16 आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेतील संघर्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असतानाच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय वार-प्रतिवार सुरू झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत गटनेता नियुक्तीबद्दलचं पत्र उपसभापतींना दिल्यानंतर ठाकरेंनीही आपली चाल चालली आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष अधिवेशनात तापण्याची चिन्ह दिसत आहेत.
मी बोलताना स्पष्ट बोलतो हे तुम्हाला माहितीये, तिथे म्हणताना त्यांनी (एकनाथ शिंदे) सांगायला पाहिजे होतं की, एमपीएससीला आम्ही कळवतो. ते तीनदा-चारदा म्हणाले की, निवडणूक आयोगाला कळवतो. मी सांगितलं की, राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोग… निवडणूक आयोग करताहेत. त्याचाही राग आला. असं कसं? आता जे चुकलं ते मी मांडणारच ना? माझं विरोधी पक्ष म्हणून काम नाहीये का? तुम्हाला एव्हढं नाकाला झोंबत असेल, तर मग एमपीएससी म्हणावं निवडणूक आयोग म्हणू नये. साधं सरळ गणित आहे. यात वाईट वाटण्यासारखं काय आहे?”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
अजित पवारांची विधानसभेत तुफान फटकेबाजी
राज्यपाल अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्ताववर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले. सरकारने स्वतःची पाठ थोपटवून घेऊ नये, राज्यपालांनी मराठी भाषण करायला हवं होतं, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, हे असे लोक कुणाचेच नसतात; फडणवीस म्हणाले,….
शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो. कायदा सुव्यवस्था बिघडणार नसेल, तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. माझा प्रश्न आहे की, शशिकांत वारिशेंच्या कुटुबीयांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आलीये का? काही जाहीर केलेलं आहे का? रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरीचे समर्थक आणि विरोधक असा वाद सुरू आहे, अशी शंका येते. आपण पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे आणि रिफायनरी संदर्भात तुमची भूमिका काय आहे?”
पंढरीनाथ आंबेरकरने दिलेल्या जाहिराती अजित पवारांनी सभागृहात दाखवल्या. त्यानंतर ते म्हणाले, “ज्याने नीच कृत्य केलं. मी पण सरकारमध्ये काम केलं आहे. तुमच्या वरिष्ठांचे फोटो त्याने लावले आहेत. तुम्ही तपासू एसआयटी लावली आहे, त्यावर अजिबात दबाव येऊ देऊ नका. अशी लोकं कुणाचीच नसतात. आमचं सरकार असतं, तर आमचा उदो उदो केला असता. त्याकरिता स्पष्ट सूचना द्याव्या लागतील. असे फोटो लावल्यामुळे शंका उपस्थित होतो. त्यामुळे तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. मास्टरमाईंड कोण आहे? ते बघितलं तर त्याने जाणीवपूर्वक केल्याचं दिसतंय.”
“एसआयटीचा पोलीस उपअधीक्षक आहे. शरद पवारांनी एका प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्याला तपास दिला होता. तशाच पद्धतीने राज्यातील प्रामाणिक अधिकाऱ्याकडे दिलं पाहिजे. यात राजकीय हस्तक्षेप झाला नाही, तर व्यवस्थित तपास होऊ शकतो. याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. हे लोकशाहीला घातक आहे. पत्रकारितेला अडचणीत आणणार आहे. दबावाला बळी न पढता सूचना अधिकाऱ्यांना देणार का?”
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी 25 लाख रुपये मदत जाहीर केली आणि दिली देखील आहे. जे आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. माझं, मुख्यमंत्र्यांचं बॅनर त्याने लावलं होतं. याचा कोणताही दबाव पोलिसांवर नाही. तात्काळ या व्यक्तीला अटक केली. 302 त्यावर लावलं. एसआयटी नेमली आहे. वरिष्ठांना त्यावर लक्ष ठेवायला सांगितलं आहे. आता पोलीस महासंचालकांना सांगेन की त्यांनी स्वतः सगळ्या पोलिसांना सूचना द्याव्यात. या नीच कृत्याप्रकरणी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तपास झाला की, हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये घेण्याची विनंती कोर्टाला करणार आहोत. जेणेकरून तात्काळ निकाल लागावा.”
Shashikant warishe: अजित पवारांनी दाखवली जाहिरात; फडणवीस म्हणाले,…
एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना सभागृहात डिवचलं; म्हणाले,…
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बुलढाण्यात शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा मुद्दा उपस्थित केला. रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. सोयाबीन, कापसाला भाव मिळावा म्हणून ते आंदोलन होतं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पोलीस अधिकाऱ्याने शेतकऱ्यांना त्रास दिला. याची चौकशी करा आणि पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी पवारांनी केली.
नाना पटोले यांनी नाफेड खरेदीसंदर्भातील मुद्दा उपस्थित केला. अमरावतीमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या लाठीमाराचा मुद्दा उपस्थित केला. शेतकऱ्यांवर पोलीस लाठीचार्ज करतात, राज्य हुकुमशाहीकडे चाललं आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. अंगणवाडी सेविकांचा मुद्दाही अजित पवार, नाना पटोले यांनी उपस्थित केला.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अंगणवाडी सेविकांबद्दल अजित पवार बोलले होते. विरोधी पक्षनेता तुमचा एकच आहे की वेगळा आहे? नाना, अशी परिस्थिती आलेली आहे की, तुम्ही सांगितलं की सभात्याग करा तरी कुणी केला नाही. अशोकराव, नाना तुमचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले सभात्याग करा, तर तुम्ही उठलेच नाही. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. नानाभाऊ सरकार संवेदनशील आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम कुणी केलंय, राज्याला माहिती आहे. बारा हजार कोटी रुपये या सरकारने दिले. हे सरकार संवेदनशील आहे म्हणून एनडीआरएफच्या नियमांच्या बाहेर जाऊन आम्ही पैसे दिले.”
विरोधकांनी घेरलं; शिंदेंच्या मदतीला फडणवीस धावले
कांदा, कापूस, तूळ उत्पादक शेतकऱ्यांसह इतर शेतमाल पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला घेरलं. विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासह भाजपच्या आमदारांनी कांद्याच्या दरवाढीचा मुद्दा मांडला.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘सभागृहाचे भावना लक्षात आल्या आहेत. शेतकऱ्यांचं सरकार आहे. निकष डावलून भरपाई दिली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार आहे. नाफेडने खरेदी केली आहे. त्याचबरोबर जिथे सुरू नसेल तिथे सुरू केली जाईल. निर्यातीवर बंदी नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला सरकार मदत जाहीर करेल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री जबाबदारीने सांगताहेत. कांद्याची खरेदी सुरू झाली आहे. लाल कांद्याची खरेदीही सुरू झाली आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर मार्ग काढायचा की राजकारण करायचं हे ठरवलं पाहिजे. कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली आहे. त्यांच्याकडे वेगळी माहिती असेल, तर त्यांनी हक्कभंग आणावा.
कांदा भाववाढीसाठी विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं
कांद्याचे दर प्रचंड घसरले असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कांद्याला भाववाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असून, आज विरोधकांनी कांदा भाववाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनं केली. ‘शिंदे सरकारनं केलं काय? जाहिरातींशिवाय दुसरं काय?’, अशी घोषणाबाजीही विरोधकांनी केली.
ठाकरेंना धक्का देण्यासाठी शिंदे करणार ‘ऑपरेशन’
विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रतोद पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, विधान परिषदेतील आमदार ठाकरे गटात आहेत. त्यामुळे शिंदे आमदारांचा पाठिंबा कसा मिळवणार याबद्दल चर्चा सुरू आहे. याबद्दल शिंदे गटाचे विधानसभेतील प्रतोद भरत गोगावले यांनी विधान परिषदेतील फूटीचे संकेत दिले आहेत.
विधान परिषदेतील प्रतोद नियुक्ती बद्दल घेतलेल्या बैठकीला किती आमदार हजर होते, याविषयी बोलताना भरत गोगावले म्हणाले, ‘संख्येचा काही प्रश्न येत नाही. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सहीने ते पत्र दिलेलं आहे. ते पत्र देण्यासाठी मी स्वतः गेलो होतो. विप्लव बाजोरिया सोबत असतानाच नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र दिलं.
संख्याबळाचा विचार केला, तर इतर आमदारांशी बोलणी सुरू आहेत का? विधान परिषदेत किती जणांचा पाठिंबा आहे? त्यावर भरत गोगावले म्हणाले, ‘लगेच नाही सांगता येणार. तसं होत नाही. हळूहळू ते काम चालू आहे. ऑपरेशन चालू आहे आणि ते ऑपरेशन आम्ही यशस्वी करू. त्यावेळी तुम्हाला कळेल.
किती दिवसांपासून या ऑपरेशनची तुम्ही तयारी करत आहात? ‘एकनाथ शिंदे ज्यावेळी काम करतात, त्यावेळी ते पक्क करतात. ते चुकीचं करणार नाहीयेत. कुणाला जबरदस्तीपण करणार नाहीये. शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीला आकर्षूनच ही मंडळी हळूहळू यायला लागली आहेत. पुढे व्यवस्थित होईल. विधान परिषदेतील ऑपरेशन सुरू आहे. जे योग्य आहे, ते करू. ज्यांना योग्य वाटतंय… पटतंय ते येताहेत’, असं भरत गोगावले म्हणाले.
Exclusive : ठाकरेंआधी शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिला वार; गोऱ्हेंना दिलं पत्र
शिवसेनेकडून विधान परिषदेत प्रतोदाची नियुक्ती
विधानसभेत स्वतःचं वर्चस्व सिद्ध केल्यानंतर शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता ठाकरे गटाला विधान परिषदेत घेरण्यास सुरूवात केली आहे आहे. त्या दिशेनं पहिलं पाऊल शिंदेंनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी टाकलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते म्हणून विधान परिषदेत विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद म्हणून निवडीचे पत्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांना दिलं आहे. उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटातील आमदारांची विधान परिषदेत कोंडी करण्याचा प्रयत्नच शिंदेंनी केला असल्याची चर्चा यानिमित्ताने सुरू झालीये.
ठाकरे गटाकडून प्रतोद नियुक्तीचं नीलम गोऱ्हेंना पत्र
शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांना प्रतोद नियुक्तीचं पत्र देण्यात आलेलं असताना ठाकरे गटाकडून विधान परिषदेत प्रतोद नियुक्तीबद्दलचं पत्र उपसभापती गोऱ्हे यांना दिलं आहे. विलास पोतनीस यांना प्रतोद, तर सचिन अहिर यांना उपनेते म्हणून नेमण्यासाठी पत्र विधान परिषदेच्या उपसभापतींना देण्यात आलं आहे. त्यामुळे अधिवेशन ठाकरे-शिंदेंच्या संघर्षाने गाजणार असंच दिसतंय.
ADVERTISEMENT