महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. यानंतर आता कोर्टाने सहा जणांना नोटीस पाठवत सहा आठवड्यात उत्तर मागितलं आहे.
ADVERTISEMENT
हे सगळं प्रकरण 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानचं आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलीप लांडे यांचा प्रचार करताना आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. प्रचाराची वेळ संपली तरीही उद्धव ठाकरेंनी लांडे यांचा प्रचार केला होता, असा आरोप नसीम खान यांनी केला आहे. नसीम खान यांनी चांदिवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी दिलीप लांडे यांनी त्यांना 409 मतांनी पराभूत केलं होतं.
निवडणूक हरल्यानंतर खान यांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र बॉम्बे हायकोर्टाने नसीम खान यांची याचिका फेटाळली. त्यानंतर आता नसीम खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. नव्या याचिकेत बॉम्बे हायकोर्टाने एकर्फी पद्धतीने आणि अन्यायकारकरित्या याचिका रद्द केल्याची बाबही नमूद कऱण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
20 ऑक्टोबर 2019 ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अनिल परब आणि अभिनेते मिलिंद गुणाजी या तिघांनीही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या प्रचाराच्या मुदतीनंतर प्रचार केला होता. 21 ऑक्टोबर 2019 ला मतदान झालं होतं. प्रचार करत असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा नसीम खान यांनी दिल्याचे खोटे व्हीडिओ प्रसारित करण्यात आले असाही आरोप नसीम खान यांनी याचिकेत केला आहे. मतदानाला 48 तास उरले असताना निवडणूक आयोगाचा नियम मोडून प्रचार करण्यात आला असंही नसीम खान यांनी म्हटलं आहे. तसंच याबाबत न्याय मिळावा म्हणून त्यांनी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
खरंतर राज्यात महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार आहे. तरीही काँग्रेसचेच नेते नसीम खान हे उद्धव ठाकरे आणि दिलीप लांडे यांच्याविरोधात थेट सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यामुळे आता ही बाब आता महाविकास आघाडीत ठिणगी टाकणारी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT