राजपुरी हळदीला मिळाला 11 हजार 500 दर
आज साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांगलीच्या हळदीच्या बाजारपेठेमध्ये हळद सौद्यांचा नवीन वर्षातला शुभारंभ पार पडला आहे. हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे आणि साडेतीन मुहूर्त पैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीचे मराठी नव वर्षात सौदे काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. या सौद्यांमध्ये हळदीला उच्चांक दर देखील मिळतो,आज पार पडलेल्या या हळद सौद्यांमध्ये 11 हजार 500 इतका सरासरी उच्चांक दर मिळाला आहे. कर्नाटकच्या रायबाग येथील शेतकऱ्यांच्या राजापुरी हळदीला हा दर मिळाला आहे.सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि हळद व्यापारी यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्ताच्या हळदीचे पूजन करून हळदीच्या सौंदयांचा शुभारंभ झाला आहे.
ADVERTISEMENT
त्यांचे अश्रू पुसायला हवे म्हणून मी हे ट्वीट करतोय -जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “डोंबिवली-शीळफाटा रस्त्यावर असलेल्या लोढा पलावा मधील काही ईमारतींना तडे गेले आहेत. तर काही ईमारती खचल्या आहेत. अशी जोरदार बातमी चर्चेला येत आहे. त्याबाबतची काही छायाचित्र देखील आलेली आहेत. एवढ्या नामांकित विकासकाच्या ईमारती 5-10 वर्षात खचायला लागल्या तर एकंदरीतच विकासकाने केलेली ईमारतीची उभारणी आणि त्याचा दर्जा याबद्दल शंका निर्माण होते.”
“या ईमारतींमध्ये फ्लॅट विकत घेणारे हे नोकरी करणारे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामधील सर्वाधिक रहिवाशी हे मराठी आहेत. ईमारत खाली करायला लावली, पण त्यांना फर्निचर देखील हलवू दिले नाही. फर्निचरची किंमत देखील 20-25 लाख इतकी आहे. मराठी माणसाला हे परत उभे करणं परवडणारे नाही. तिथे राहणाऱ्या सर्व समाजबांधवांबद्दल मला प्रचंड वाईट वाटत आहे. मला दूरध्वनीद्वारे अनेक रहिवाशांनी अश्रू ढाळत ही बातमी सांगितली. त्यांचे अश्रू पुसायला हवे म्हणून मी हे ट्वीट करीत आहे. उद्या या ईमारतींची परिस्थिती देखील बघायला जाणार आहे”, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
‘बाकी सविस्तर बोलूच, शिवतीर्थावर या’ -राज ठाकरे
गुढी पाडव्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना राज ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील मनसे मेळाव्याला येण्याचं आवाहन केलं आहे. “आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. बाकी सविस्तर बोलूच, शिवतीर्थावर या!”, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सहभाग!
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच गुढी पाडव्याच्या स्वागत यात्रेत एकनाथ शिंदे सहभागी झाले. कोळीनेश्वर देवस्थान जांभळी नाका येथून सुरू झालेल्या स्वागत यात्रेत मुख्यमंत्र्यांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून शोभा यात्रेची सुरुवात केली. त्यानंतर ते स्वःत जांभळी नाका, टेंभी नाका चरई ते हरिनिवास सर्कल पर्यंत शोभा यात्रेत सहभागी झाले. यादरम्यान त्यांचं ठाणेकरांनी स्वागत केलं तर, मुख्यमंत्र्यांनी ठाणेकरांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
Gudhi Padwa : राज्यातील जनतेला फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा
गुढीपाडव्यानिमित्त नागपुरातील लक्ष्मीनगर येथे बुधवारी सकाळी शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. फडणवीस यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
गुढीपाडव्या निमित्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा होणार असून, मुंबईतील शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा होणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडी, आगामी महापालिका निवडणूका आणि सातत्याने होत असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत राज ठाकरे यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता. गुढीपाडव्याच्या सभेत पिक्चरच दाखवतो, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे मनसेप्रमुख काय बोलणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.
ADVERTISEMENT