-प्रतिनिधी, रत्नागिरी/रायगड
ADVERTISEMENT
मोठी दडी मारल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस परतला. गेल्या २४ तासांपासून राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू असून, कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव खोऱ्यात तसेच रत्नागिरी जिल्ह्यातीलही काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे.
माणगाव खोराला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. या भागातील उपवडे, शिवापूर,आंजिवडे, दुकानवड, हळदीचे नेहरू, वसोली, शिवापूर, पुळास, वाडोस, महादेवाचे किरवडे आदी भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे.
रात्रभर पाऊस पडत असल्याने या भागातील उपवडे व दुकानवाड पूल ही दोन्हीही पूल पाण्याखाली गेले आहेत. या भागातील बहुतांशी पूल पाण्याचा प्रवाह वाढल्याने पाण्याखाली गेले आहेत. शनिवारी (७ ऑगस्ट) या भागाला पावसाने दिवसभर झोडपले. आज रात्रभर पुन्हा पाऊस पडत होता.
रविवारी सकाळी पावसाने थोडीशी विश्रांती घेतली. तरीही या पुलांवरील पाणी ओसरलं नव्हतं. त्यामुळे वाहतूक खोळंबली आहे. तर धावलवाडी येथील पूल वाहून गेला आहे. माणगाव खोऱ्यातील नदी व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरची वाहतूक बंद
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका जिल्ह्यातील काही ठिकाणच्या शेतीला बसला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 83.33 मिमी पावसाची नोंद झाली आहे. संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यांमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे गुहागरमधील शृंगारतळी येथे पावसामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक दुकानात पाणी शिरलं आहे. त्यामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप आलं आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्यानं या ठिकाणी प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरीतील भंडारपुळे येथील पुलावरून पाणी जाऊ लागल्याने हा रस्ता प्रशासनाने तात्पुरता बंद केला आहे. त्यामुळे रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरची वाहतूक बंद झाली आहे.
तळकोकणात गेले तीन दिवस सतत पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून, जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. कणकवलीत तर या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला.
कणकवलीतील गड नदीला पूर येऊन नदी पात्र सोडून वाहत आहे. तसेच वरवडे येथील गड नदी व जानवली नदी एकत्र येऊन मिळतात त्या संगमावर ही पुरसदृश्य परिस्थिती बघायला मिळत आहे. नदी पात्राच्या उंचीवरून नदीचे पाणी वाहत असून, तेथील कॉज वेही पाण्याखाली गेला आहे.
ADVERTISEMENT