महाराष्ट्रात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट बघावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाने कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राजेश टोपे यांनी यासंदर्भातले संकेत दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
वर्षा गायकवाड यांचं म्हणणं काय?
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि आरोग्य सांभाळण्यासाठी निर्णय घेत आलो आहोत. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय. टास्क फोर्स काय म्हणालं, या संदर्भातील माहिती घेणार असल्याची प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद होत्या. त्या उघडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 17 ऑगस्टपासून शहरी आणि ग्रामीण भागातल्या शाळा विद्यार्थ्यांसाठी उघडल्या जाणार आहेत. यासंदर्भातली तारीख आधीच जाहीर झाली होती. सरकारने आता मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या.
काय होत्या मार्गदर्शक सूचना?
17 ऑगस्टपासून शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरक्षित पणे सुरू केले जातील
मुंबई, ठाणे या शहरांमधील कोव्हिडची परिस्थिती विचारात घेऊन संबंधित महापालिका आयुक्तांना याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार
अन्य जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी योग्य परिस्थिती पाहून निर्णय घेणार
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत स्तरावर समिती गठित करण्याच्या सूचना
समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी शहरात किंवा गावात कमीत कमी एक महिना कोव्हिडचा प्रादुर्भाव नाही हे बघावे
शिक्षकांचं लसीकरण झालेलं आहे ना हे तपसावे
गर्दी टाळण्यासाठी पालकांना शाळेत प्रवेश दिला जाणार नाही
कोव्हिडच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जाणार
विद्यार्थी कोव्हिडग्रस्त आढळला तर शाळा बंद करून निर्जंतुकीकरण करणे
शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात किंवा शहरात करावी
असं सगळं जाहीर करूनही आता शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. यावरून आता विरोधकांनीही ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
ADVERTISEMENT