मुंबई: मुंबई विमानतळावर सोमवारी (10 जानेवारी) एक मोठा अपघात टळला आहे. एअर इंडियाच्या विमान AIC-647 मुंबई-जामनगर या विमानाला पुशबॅक देणाऱ्या वाहनाला विमानतळावर अचानक आग लागली. त्यावेळी विमानात 85 प्रवासी होते. ट्रॅक्टरला आग लागल्यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला होता.
ADVERTISEMENT
मात्र, विमानतळ प्रशासनाने तत्परता दाखवत ही आग तात्काळ विझवली. V26R स्टँडवर हा अपघात झाला. सुदैवाने यावेळी विमानाचे कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र, या आगीच्या घटनेमुळे विमान उड्डाणास बराच उशीर झाला. अखेर 12.04 वाजता विमानाने उड्डाण केलं.
एअर इंडियाच्या फ्लाइटच्या गाडीला अचानक आग लागण्याचं कारण अद्याप तरी समजू शकलेलं नाही. पण या सगळ्या प्रकारामुळे विमानतळ प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले. मात्र, वेळीच आग अटोक्यात आल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विमानाला पुशबॅक करणारं हे वाहन ट्रॅक्टर असल्याचे समजतं आहे. एअर इंडियाच्या या विमानाला पुशबॅक करण्यासाठी हा ट्रॅक्टर आणण्यात आला होता. हा ट्रॅक्टर विमानाच्या अगदी जवळच उभा होता. पण अचानक या टॅक्टरने पेट घेतला. ऐनवेळी इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याने ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
आग कशी लागली याबाबत प्राधिकरणाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. विमानतळावर अशाप्रकारची घटना ही खरं तर एक चिंताजनक बाब आहे. ज्याबाबत आता सलोख चौकशी देखील केली जाण्याची शक्यता आहे.
न्यूयॉर्कमधल्या इमारतीला भीषण आग, 9 लहान मुलांसह 19 जणांचा होरपळून मृत्यू
हा नेमका अपघातच होता की, घातपाताचा काही प्रकार होता? असेही प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. त्यामुळे विमानतळ प्रशासनाला आता या सगळ्या दृष्टीने या घटनेचा तपास करावा लागणार आहे. ज्यानंतर या दुर्घटनेची नेमकी माहिती समोर येऊ शकेल.
ADVERTISEMENT