अभूतपूर्व गोंधळात माळेगावची सर्वसाधारण सभा संपन्न; ठराव मंजुरीनंतर संचालकांचा काढता पाय

मुंबई तक

• 03:11 AM • 01 Oct 2022

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली. कार्यक्षेत्रात दहा गावांचा समावेश करण्याचा ठराव तसेच, ऊस क्षेत्राच्या प्रमाणात सभासदांचे शेअर्स (भाग) वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मंजूर झाला. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने सर्व विषयांना मंजूर… मंजूर… अशा घोषणा देत सभेतून काढता पाय घेतला. शुक्रवारी सायंकाळी ही सभा संपन्न झाली. […]

Mumbaitak
follow google news

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा अभूतपूर्व गोंधळात पार पडली. कार्यक्षेत्रात दहा गावांचा समावेश करण्याचा ठराव तसेच, ऊस क्षेत्राच्या प्रमाणात सभासदांचे शेअर्स (भाग) वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही मंजूर झाला. गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने सर्व विषयांना मंजूर… मंजूर… अशा घोषणा देत सभेतून काढता पाय घेतला. शुक्रवारी सायंकाळी ही सभा संपन्न झाली.

हे वाचलं का?

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. शुक्रवारी या कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू होती. कारखान्याचे माजी संचालक आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या बैठकीला उपस्थित होते.

सभा सुरु झाल्यानंतर तब्बल आठ तास ताळेबंदातील अहवालावर चर्चा सुरू होती, अखेर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात दहा गावे वाढविण्यासाठी सर्वसाधारण सभेपुढे विषय मांडण्यात आला. अंजनगाव, जळगाव सुपे, जळगाव कडेपठार, नारोळी, कोळोली, कारखेल, देऊळगाव, काऱ्हाटी, भिलारवाडी, खराडेवाडी, आदी दहा गावे माळेगाव कारखान्याने पत्राद्वारे मागितली होती. पुरुषोत्तम जगताप, दिलीप परकाळे, गोरख चौलंग, सुरेश वळकुंद्रे, अनिल जगताप, संजय पोमण यांनी ही गावे‘माळेगाव’कडे जाऊ द्यावे, अशी भूमिका मांडली.

मात्र या विषयावर सत्ताधारी संचालक मंडळाचे समर्थक आणि विरोधी गटाचे सभासद यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. दिलीप पवार यांच्यासह काहींनी ‘सोमेश्वर’च हवा, असल्याची भूमिका मांडली. माळेगाव कारखाना जिंकण्यात सव्वाशे मतांचाच फरक आहे. तो वाढविण्यासाठी ही गावे ‘माळेगाव’ला जोडत आहेत, असा आरोप करण्यात आला. अखेरीस गोंधळाच्या वातावरणातच सत्ताधारी संचालक मंडळाने हा विषय मंजूर करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, त्याला जोरदार आक्षेप घेत विरोधी गटाच्या सभासदांनी नामंजूर करण्यासाठी हात उंचावून जोरदार घोषणाबाजीस सुरुवात केली. गोंधळाच्या वातावरणातच माईकची मोडतोड करून सभासदांनी गोंधळ घातला. संचालक मंडळाने हा विषय आवाजी मताने मंजूर करुन सभेतून काढता पाय घेतला. संचालक मंडळ गेल्यानंतरही कारखान्याचे बहुतांश सभासद सभागृहात उपस्थित होते.

दरम्यान, कारखाना कायम राष्ट्रवादीच्या ताब्यात राहावा यासाठी अजित पवार यांचा हा कुटील डाव असल्याचा आरोप रंजन तावरे यांनी केला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून दहा गावे वगळून माळेगावला जोडण्याचा प्रयत्न केले जात आहे. मात्र, त्यासाठी गुप्त मतदान घ्यावे अशी मागणही तावरे यांनी केली. याशिवाय संचालक मंडळाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.

    follow whatsapp