मुख्यमंत्री शिंदे जे पद विसरले, त्याचाच उल्लेख मुलासह बंडखोरांनी केला!

मुंबई तक

• 11:23 AM • 27 Jul 2022

मुंबई: शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. यात त्यांना संबंध देशातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये सर्वात चर्चेची गोष्ट ठरतीये ती बंडखोर आमदार, खासदारांच्या शुभेच्छांची. 27 जुलै ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस म्हणून ओळखली जातेय. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडानंतरचा ठाकरेंचा हा पहिलाच […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. यात त्यांना संबंध देशातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये सर्वात चर्चेची गोष्ट ठरतीये ती बंडखोर आमदार, खासदारांच्या शुभेच्छांची. 27 जुलै ही तारीख महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस म्हणून ओळखली जातेय. त्यातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या बंडानंतरचा ठाकरेंचा हा पहिलाच वाढदिवस.

हे वाचलं का?

किती आमदार ठाकरेंसोबत आणि किती खासदार ठाकरेंच्या बाजूने हा प्रश्न आता जुना होऊ लागला आहे, त्याच्याही पुढे आता महत्वाचा प्रश्न समोर आलाय, तो म्हणजे किती आमदार आणि किती खासदार हे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे पक्ष प्रमुख मानतात? हेच आपण जाणून घेणार आहोत.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे (Shivsena) प्रमुख होणार का?, धनुष्यबाण शिंदेंना मिळणार का?, शिंदे गटाचा प्रमुख कोण असे अनेक प्रश्न समोर येत असताना शिंदे गटातील आमदार आणि खासदार हे उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख मानतात का? हा मोठा प्रश्न सध्या उभा राहिला आहे.

एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंच्या पदाचा विसर

सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून करुया. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खऱ्या मात्र त्या शुभेच्छांमध्ये पक्षप्रमुख हा शब्द नसून माजी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. हाच उल्लेख अनेक आमदार आणि खासदारांनी केला. मात्र शिंदे गटातही असे अनेक आमदार, खासदार आहेत, ज्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केला आहे.

मुख्यमंत्री विसरले पण श्रीकांच शिदेंना उद्धव ठाकरेंचे पद लक्षात

एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत. शिंदे गटातील खासदार धैर्यशील माने यांनीही शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर हेमंत गोडसे यांनी देखील आपल्या शुभेच्छांमध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री असा उल्लेख उद्धव ठाकरे यांचा केला आहे.

अनेक आमदरांनी केला पक्ष प्रमुख म्हणून उल्लेख

बंडाची सुरुवात ज्यांच्यापासून झाली त्या आमदारांच्या शुभेच्छांवरही नजर टाकूया. सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे गुलाबराव पाटील. शिवसेना पक्षप्रमुखांचा उल्लेख असलेला बॅनर पाटलांनी शेअर केला आहे. शिंदे गटातील आमदार बालाजी किणीकरांनी तर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो शेअर करत पक्षप्रमुख म्हणून उल्लेख केला आहे.

यानंतर शिंदे गटातील बुलडाणा मतदार संघाते आमदार संजय गायकवाड, उमरगा – लोहरा मतदार संघाचे शिंदे गटातील आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार यामिनी जाधव, माजी मंत्री रामदास कदम यांचा मुलगा आमदार योगेश कदम या शिंदे गटातील आमदारांनीही उद्धव ठाकरे यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख म्हणून केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जो उल्लेख आपल्या शुभेच्छांमध्ये टाळला, तोच शिवसेना पक्षप्रमुखांचा उल्लेख मुलगा श्रीकांत शिंदेंसह काही बंडखोर आमदारांनी केल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटातील अनेक आमदार आणि खासदारांनी अद्यापही एकनाथ शिंदेंप्रमाणे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख केलाय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

    follow whatsapp