Matrimonial Site Fraud : मुंबईतील दिंडोशीमध्ये पोलीस एका 51 वर्षीय व्यक्तिचा शोध घेत असून, विधवा महिलांना फसवून त्यांचे दागिने आणि पैसे घेऊन पळून जाण्याचा गंभीर प्रकार या व्यक्तिकडून केला जात असल्याचा आरोप आहे. प्राथमिक माहितीनुसार, 51 वर्षीय पुरूषानं मॅट्रिमोनियल साईटच्या मदतीने एका महिलेशी लग्न केलं आणि लग्नाच्या काही दिवसांनंतर, तो तिचे दागिने आणि पैसे घेऊन फरार झाला. आरोपी एका इव्हेंट कंपनीत वित्त प्रमुख म्हणून काम करतो अशीही माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
मॅट्रिमोनियल साईटवर झाली भेट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका मॅट्रिमोनियल साईटद्वारे दिंडोशी परिसरात राहणाऱ्या एका विधवा महिलेशी मैत्री केली आणि नंतर तिच्याशी लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यांतच, तो महिलेचे 17 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने घेऊन पळून गेला. नोव्हेंबरमध्ये गोरेगाव येथील एका मंदिरात महिलेनं त्याच्याशी लग्न केलं. यानंतर हे जोडपं मालाड (पूर्व) येथे राहू लागलं.
महिलेने दिंडोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली की, गेल्या आठवड्यात एक दिवस सकाळी उठल्यावर तिला तिचा पती बेपत्ता दिसला. त्याचा फोनही बंद होता. तिने घराची झडती घेतली तेव्हा तिला कपाटात ठेवलेले 17.15 लाख रुपयांचे दागिनेही गायब असल्याचं आढळलं. त्यानंतर घाबरून तिने आपल्या मुलीला आणि इतर नातेवाईकांना कळवलं.
आरोपीने अनेक महिलांना फसवलं?
त्यानंतर ती महिला मालाड पश्चिममध्ये असलेल्या आरोपी पतीच्या कार्यालयात गेली आणि तिला कळलं की तो काही महिन्यांपासून कामावर आलाच नाही. तिथे त्तिला सांगण्यात आलं की, त्याने कंपनीचेही लाखो रुपयेही लंपास केले आहेत. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला सांगितलं की, तिच्या आधी अनेक महिला त्याला शोधत इथे आल्या होत्या. यानंतर महिलेला समजलं की, तिची फसवणूक झाली.
ADVERTISEMENT
