महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या रूग्णसंख्येने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे. अमरावतीमध्ये १ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात काय काय गोष्टी घडतात? रुग्ण वाढतात का? कोरोनाचा प्रादुर्भाव होतो आहे का? या सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची नजर आहे. पुढचे आठ दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. इंडिया टुडेने वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात महाराष्ट्राचा जो आढावा घेतला आहे, त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की अमरावती आणि नागपूरमध्ये हे प्रमाण अधिक आहे. अमरावतीत ५४६ केसेस आढळल्या तेव्हा नागपुरात ५२२ केसेस आढळल्या. मुंबईतल्या ४३३ या कोरोना केसेसच्या संख्येलाही मागे टाकणाऱ्या या संख्या ठरल्या आहेत.
ADVERTISEMENT
अमरावती आणि नागपूर हे महाराष्ट्राच्या ईशान्य देशाला येतात. तर जालना हे मध्यावर येतं. उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर आणि नंदुरबार हे जिल्हे दक्षिणेकडे येतात. मात्र या चार जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांचं प्रमाण कमी झालं आहे. २२ फेब्रुवारीला महाराष्ट्रात ५ हजार २१० अॅक्टिव्ह रूग्ण होते. तर संपूर्ण देशात त्या दिवशी १ लाख ४७ हजार ३०६ अॅक्टिव्ह रूग्ण होते.
या पाच शहरांमध्ये वाढले रूग्ण
सोमवारी समोर आलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येनुसार अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई आणि यवतमाळ या ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाली. मागील सोळा दिवसांमध्ये अमरावतीत ५ हजार अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर पुण्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले. मृत्यूंबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात आत्तापर्यंत कोरोनाची बाधा होऊन ५१ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. एवढंच नाही महाराष्ट्रात आत्तापर्यंत ९ लाख २९ हजार ८४८ जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर ७३ हजार ८५८ जणांना आत्तापर्यंत कोरोना प्रतिबंध करणाऱ्या लसीचा दुसरा डोसही देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत १२ लाख २६ हजार ७७५ कोविड योद्ध्यांना कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशानंतर कोरोना लसीकरणामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही या ठिकाणी रुग्णांची संख्या वाढते आहे ही बातमी नक्कीच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी ठरते आहे.
ADVERTISEMENT