पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदी हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासह अन्य विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधीच केंद्र सरकारने मेट्रो-२ प्रकल्पाला मंजुरी प्रदान केली आहे.
ADVERTISEMENT
नागपूर मेट्रो दोन चा प्रकल्प एकूण ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा असून त्याअंतर्गत ४३.८ किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन तयार केली जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षात म्हणजेच २०२८ पर्यंत पूर्ण होईल अशी शक्यता आहे. केंद्र सरकारने मंजुरी प्रदान केलेल्या या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील सर्व चारही लाईनला पुढे वाढवण्यात आलेले आहे.
मेट्रो -2 प्रकल्पामध्ये सध्या स्थितीत खापरीपर्यंत धावत असलेली मेट्रो बुटीबोरी शहरापर्यंत, ऑटोमोटिव्ह पर्यंत सध्या स्थितीत धावत असलेली मेट्रो कन्हान शहरापर्यंत, प्रजापती नगर येथे सध्या स्थितीत धावत असलेली मेट्रो कापसी पर्यंत आणि लोकमान्य नगर पर्यंत सध्या स्थिती धावत असलेली मेट्रो हिंगणा या गावापर्यंत जाणार आहे.
विशेष म्हणजे बुटीबोरी आणि हिंगणा पर्यंत मेट्रोच्या या विस्तारामुळे मोठ्या संख्येत प्रवासी मिळण्याची अपेक्षा आहे कारण हे बुटीबोरी आणि हिंगण हे दोन्हीही औद्योगिक क्षेत्र असून मोठ्या संख्येत नागपूर शहरातील कर्मचारी या ठिकाणी असलेल्या विविध कंपन्यांमध्ये ये जा करत असतात.
नागपूर मेट्रो-2 प्रकल्पाला बुधवारी केंद्र सरकारने मंजुरी प्रदान केली असल्याची माहिती नागपूर मेट्रो तर्फे देण्यात आलेली आहे.
ADVERTISEMENT