प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न चिघळला आहे. कर्नाटकातल्या मराठी भाषिकांवर अन्याय होतो आहे. तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडाला कुलूप का? एकनाथ शिंदेंच्या पक्षाला ढाल-तलवारीच्या ऐवजी कुलूप ही निशाणी द्यायला हवी होती अशी टीका संजय राऊत यांनी केली. त्यावर आज अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे अब्दुल सत्तार यांनी?
संजय राऊत यांनी जी टीका केली त्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांना कडी कुलुपाची आठवण येते आहे. संजय राऊत हे काही दिवस तुरुंगात राहून आले आहेत. एकदा माणूस आतमध्ये राहून आला की त्याला कुलूप चावीची खूप आठवण येते असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला खोचक उत्तर दिलं आहे.
आणखी काय म्हणाले अब्दुल सत्तार?
शरद पवार यांनी सीमा प्रश्नावर यांनी जी भूमिका मांडली त्यावरही अब्दुल सत्तार यांनीही भाष्य केलं. शरद पवार यांनी जी भूमिका मांडली ती महाराष्ट्राच्या वतीने बोलले. अनेक वर्षे त्यांनी संघर्ष केला आहे. त्यांना सीमा प्रश्नाची जाण आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. राज्याच्या हितासाठी ते बोलले त्यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी असलं पाहिजे असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
मंत्रिमंडळ विस्तार होणार ही काळ्या दगडावरची रेष
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होईल असं सांगितलं होतं. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार नक्की होईल. मंत्री मंडळ विस्तार होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. फक्त मला तारीख सांगता येणार नाही. गुजरात निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. तिथे घवघवीत यश मिळालं. त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असंही अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं.
सुषमा अंधारेंबाबतही भाष्य
सुषमा अंधारे ही माझी बहीण माझी नक्कल करते. मी त्या माझ्या बहिणीबाबत काही बोलणार नाही. नक्कल करायला अक्कल लागते. त्यांनी बोललं की मतं आमची वाढतात त्यांनी असंच बोलत राहावं असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT