मालाडमध्ये मेट्रोच्या कामासाठी झोपड्या पाडल्या, विरोध करणारे BJP MLA अतुल भातखळकरांना अटक

मुस्तफा शेख

• 06:13 AM • 17 Jul 2021

मुंबईच्या मालाड परिसरातील कुरार भागात मेट्रोच्या कामासाठी स्थानिकांच्या झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईला विरोध करणाऱ्या भाजप आमदार अतुल भातखळकरांना पोलिसांनी अटक केली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या या कारवाईमुळे मालाड परिसरात तणावाचं वातावरण पहायला मिळालं. मालाड कुरार येथे MMRDA कडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री १२ वाजता या […]

Mumbaitak
follow google news

मुंबईच्या मालाड परिसरातील कुरार भागात मेट्रोच्या कामासाठी स्थानिकांच्या झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईला विरोध करणाऱ्या भाजप आमदार अतुल भातखळकरांना पोलिसांनी अटक केली आहे. सकाळपासून सुरु असलेल्या या कारवाईमुळे मालाड परिसरात तणावाचं वातावरण पहायला मिळालं.

हे वाचलं का?

मालाड कुरार येथे MMRDA कडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री १२ वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह ही कारवाई करायला सुरुवात झाली. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला आहे.

दरम्यान स्थानिक आमदार अतुल भातखळकरांनी घटनास्थळी धाव घेत या कारवाईला विरोध केला. हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यासाठी मनाई केलेली असतानाही पोलिसांनी बळजबरीने कारवाई केली. चमकोगिरी करण्यासाठी मराठी माणसाला भर पावसात घराबाहेर करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जनता लक्षात ठेवेल असा इशाराही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

दरम्यान कोविड काळात घर तोडण्यास हायकोर्टाने मनाई केलेली असतानाही कुरारवासियांवर ही कारवाई करण्यात आली. याविरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचं भातखळकरांनी स्पष्ट केलंय. मला अटक करुन हा लढा थांबणार नाही. विरोध करणाऱ्या स्थानिकांना पोलिसांनी नग्न करुन मारहाण केली. स्थानिकांना योग्य घरं मिळाली पाहिजेत, तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहिलं असंही भातखळकर म्हणाले.

    follow whatsapp