‘आदिपुरूष’ला भाजपचा विरोध तर मनसेचा पाठिंबा, जाणून घ्या नेमकं कुणी काय म्हटलंय?

मुंबई तक

07 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:47 AM)

आदिपुरूष या सिनेमाचा टिझर समोर आल्यानंतर त्यावरून बरीच टीका होते आहे. या सिनेमात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. त्याचा रावणाचा लुक हा लोकांना पसंत पडलेला नाही. कुणी त्याला खिलजी म्हणत आहेत तर कुणी त्याला औरंगजेब म्हणत आहेत. नेटकरी या लुकवर टीका करत असतानाच आता भाजपने या सिनेमाला विरोध दर्शवला आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित […]

Mumbaitak
follow google news

आदिपुरूष या सिनेमाचा टिझर समोर आल्यानंतर त्यावरून बरीच टीका होते आहे. या सिनेमात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. त्याचा रावणाचा लुक हा लोकांना पसंत पडलेला नाही. कुणी त्याला खिलजी म्हणत आहेत तर कुणी त्याला औरंगजेब म्हणत आहेत. नेटकरी या लुकवर टीका करत असतानाच आता भाजपने या सिनेमाला विरोध दर्शवला आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असं भाजपने म्हटलंय तर दुसरीकडे मनसेने मात्र आदिपुरूष सिनेमाला पाठिंबा दर्शवला आहे.

हे वाचलं का?

आदिपुरूष मधल्या सैफच्या लुकवरून वाद, हिंदू महासभा म्हणते हा तर आतंकी खिलजी!

भाजप आमदार राम कदम यांनी काय म्हटलं आहे?

चित्रपटातील व्हीएफएक्स आणि सिनेमातल्या सैफ अली खानच्या भूमिकेवर अनेक नेटकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्विट केले आहे. आदिपुरूष हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी एका किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी-देवतांचं विडंबन केलं आहे. कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला निर्मात्यांनी ठेच पोचवली आहे. आता विडंबनावरून त्यांनी माफी मागावी असंही राम कदम यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर कुठल्याही दृश्यांची काटछाट करून चालणार नाही. अशी घाणेरडी विचारधारा असलेल्या लोकांना धडा शिकवायला हवा. अशा प्रकारच्या कोणत्याही चित्रपटावर कामयची बंदी किंवा संबधित लोकांनी इंडस्ट्रीत काम करण्यावर काही वर्षे बंदी घालण्यात यावी अशी मागणी राम कदम यांनी केली. त्यानंतर आता मनसेने मात्र या सिनेमाला पाठिंबा दर्शवला आहे.

काय म्हटलं आहे मनसेच्या अमेय खोपकर यांनी?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ओम राऊत यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. मी त्यांना चांगला ओळखतो. ओम राऊत हे हिंदुत्ववादीच आहेत. त्यांच्याकडून चूक होणार नाही. राम कदम असतील किंवा आपल्याला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे जे कुणी असतील त्यांनी ९५ सेकंदांच्या टिझरवरून सिनेमा कसा असेल त्याचा अंदाज कसा लावू शकतात? लोकांना निर्णय घेऊ द्या असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

पुढे अमेय खोपकर यांनी काय म्हटलं आहे?

ओम राऊत यांच्या आगामी आदिपुरूष सिनेमावरून टीका होणं दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे त्यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना चित्रपट कर्मचारी सेनेचा आदिपुरूषला पूर्ण पाठिंबा आहे.

आदिपुरूष या सिनेमात काय आहे?

आदिपुरुष हा सिनेमा रामायणावर आहे. या सिनेमात प्रभू रामचंद्रांची भूमिका प्रभासने साकारली आहे. क्रीती सनॉन सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. सैफच्या लुकवरून त्याच्यावर बरीच टीका केली जाते आहे. अशात आता या सिनेमावरून भाजप आणि मनसे आमनेसामने आले आहेत.

    follow whatsapp