मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा पत्रकार परिषद आणि भाषणांमध्ये राज ठाकरेंच्या या स्वभावाचा अंदाज अनेकांना पहायला मिळाला आहे. सध्या पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंची नाराजी स्थानिक पत्रकारांनी ओढवून घेतली.
ADVERTISEMENT
रात्री ८ वाजल्याच्या सुमारास राज ठाकरे पुण्यातील बाजीराव रोडवरील अक्षरधारा बुक गॅलरीत पुस्तक खरेदी करण्यासाठी आले होते. पत्रकारांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांची बुक गॅलरीबाहेर गर्दी केली. राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा आल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्याच्या लाईटचा राज ठाकरेंना त्रास व्हायला लागला.
ज्यानंतर त्यांनी उपस्थित पत्रकारांना जगू द्याल की नाही? बंद करा तो लाईट, प्रत्येकाला वेगळं सांगत बसू का? असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. पाहा हा व्हिडीओ…
दरम्यान, मुंबई-ठाणे आणि औरंगाबाद येथील सभांमध्ये मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसेचा मुद्दा गाजवल्यानंतर राज ठाकरे आपली चौथी सभा पुण्यात घेणार असल्याचं कळतंय. २१ मे रोजी ही सभा होणार असल्याचं कळतंय. पुण्यातील भिडे पुलाशेजारी असलेल्या नदीपात्राचं ठिकाण निवडण्यात आलं आहे. मनसेच्या नेत्यांकडून आणि पोलिसांकडून सभास्थळाची पाहणी केली जाईल. या सभेला काय नियम आणि अटी लावायच्या? याचा निर्णय पोलीस घेतील असंही मनसेने म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता पुण्यात जी सभा घेतील त्या सभेत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बाळासाहेबांचं सोंग घेतलेले मुन्नाभाई सध्या फिरत आहेत असं उद्धव ठाकरेंनी १४ मे रोजी घेतलेल्या सभेत म्हटलं होतं. तसंच राज ठाकरेंची खिल्लीही उडवली होती. या खिल्लीला राज ठाकरे उत्तर देणार का? आणि ते नेमकं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT