महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या राजकीय परिस्थितीनंतर स्वबळावर लढण्याची तयारी करा असे आदेश दिले आहेत. जो काही राजकीय चिखल राज्यात झाला आहे त्यानंतर मनसेला संधी आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं. ही माहिती संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई तकशी संवाद साधला.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला
शिवसेनेला (ठाकरे गट) सहानुभूती मिळते आहे हा भ्रम आहे. लोक सध्याच्या राजकीय परिस्थितीला कंटाळले आहेत. लोक मनसेकडे पर्याय म्हणून पाहात आहेत. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा. मी तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणार, मी स्वतः सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला असंही संदीप देशपांडे यांनी सांगितलं.
आणखी काय म्हणाले राज ठाकरे?काय सांगितलं संदीप देशपांडेंनी?
लवकरच आपण सत्तेच्या खुर्चीवर असू, आपल्यापैकी एक कार्यकर्ता त्या खुर्चीवर असेल. त्यामुळे आता लढायाची तयारी ठेवा असंही राज ठाकरेंनी सांगितलं. तसंच निवडणुकीच्या तयारीला लागा असंही सांगितलं.
कार्यकर्त्यांना दिला सहा M चा फॉर्मम्युला
मेसेज, मेसेंजर, मनी, मसल, माईंड आणि मॅकेनिक हे सहा M आहेत मॅकेनिक म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करा, मेसेज म्हणजे आपले विचार मेसेंजरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचला. मसल म्हणजे ताकदीने लोकांपर्यंत जा आणि विचार न्या. मनी लागेल तो आपण उभा करू निवडणुकीत जिंकू असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मनसेबद्दल लोक सकारात्मक असून, तुम्हीदेखील सकारात्मक राहा. आपण सत्तेत येऊ आणि तुम्हालाच त्या खुर्चीवर बसायचं आहे,” असं राज ठाकरेंनी सांगितलं असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. बाळासाहेबांनी कधीच आपल्याकडे कोणतं पद घेतलं नव्हतं आणि तीच शिकवण राज ठाकरेंकडे आहे. सत्तेचा रिमोट कंट्रोल ज्याप्रकारे बाळासाहेबांकडे होता, त्याप्रकारे आम्ही सत्तेत आल्यानंतर तो राज ठाकरेंकडे असेल असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांनाही अपयश आलं होतं. फक्त यशच मिळालं असं नाही. त्यांनाही पराभव पाहावा लागला. पण पराभवामुळे ते रडत बसले नाहीत. आम्हीही विजय पाहिला आणि पराभवही पाहिला. आम्हीही रडत बसलो नाही कारण राज ठाकरे हे बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे आहेत. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला मोठं यश मिळेल असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT