औरंगाबाद येथे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) १ मे रोजी सभा घेतली. या सभेत त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) पुन्हा एकदा टीका केली आणि त्याचप्रमाणे भोंग्यांचा मुद्दाही उपस्थित केला होता. या सभेला बरीच गर्दी झाली होती. तसंच गुढीपाडव्यालाही सभा घेतली होती. यातला फोटो शिवसेनेने (Shivsena) त्यांच्या टिझरमध्ये वापरल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळेंनी (Gajanan Kale) केला आहे. तर मनसे नेते किर्तीकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या सभेचा फोटो टिझरमध्ये वापरताना शिवसेनेला लाज वाटत नाही का हा प्रश्न उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
मनसेचे नेते गजानन काळे यांनी दावा केला आहे की शिवसेनेने लाँच केलेल्या टिझरमध्ये जे फोटो आणि दृश्यं वापरली आहेत ती राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी जी सभा घेतली आहे त्यातली आहेत. राज ठाकरे यांच्या सभेतली दृश्यं आणि फोटो शिवसेनेने टिझरमध्ये वापरल्याचा दावा गजानन काळे यांनी केला आहे.
काय म्हणाले आहेत गजानन काळे?
“असली नकली म्हणणाऱ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करा. काहीतरी अस्सल तुमचंही असुद्या. इतकेही नकली होऊ नका. सभा शिवसेनेची आणि व्हीडिओत गर्दी मनसेच्या सभेची… अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की… नकली हिंदुत्ववादी”
गजानन काळे यांनी म्हटलं आहे की शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शिवसेनेच्या १४ मे रोजी होणाऱ्या सभेचा टिझर देण्यात आला आहे. यातली गंमत अशी की या व्हीडिओत शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेचे फोटो वापरण्यात आले आहेत. शिवसेनेला नेमकं काय झालं आहे?
काय म्हणाले किर्तीकुमार शिंदे?
शिवसैनिकांनी सभेला यावं म्हणून कै. बाळासाहेब ठाकरे यांचे जुने व्हिडिओ वापरायचे असतील तर वापरा…
पण मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभेचे व्हिडिओ फुटेज वापरायला तुम्हाला लाज कशी वाटत नाही? कुठे नेऊन ठेवली बाळासाहेबांची शिवसेना? असं म्हणत किर्तीकुमार शिंदे यांनीही शिवसेनेला डिवचलं आहे.
आता या सगळ्या आरोपांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे १४ मे रोजी होणाऱ्या सभेत उत्तर देणार का? मनसेला यावरून खडे बोल सुनावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT