मुंबई: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुलाब चक्रीवादळाची निर्मिती झाली. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात झाला. कारण याच चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस झाला. ज्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्या अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. ज्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी टीका केली होती. ज्याला आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
मंत्री गुलाबराव पाटील हे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना पत्रकारांनी राज ठाकरे यांनी केलेल्या मागणीबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया काय असा सवाल विचारला होता. ज्यावर गुलाबराव पाटील असं म्हणाले होते की, ‘राज ठाकरे यांनी मागणी केली हे मान्य. पण त्यांनी मागणी केली म्हणजे काही मोठं काम केलं नाही. राजकारण करू नका, अशी एक प्रकारे टीकाच केली होती.
दरम्यान, याच टीकेला आता मनसे नेते अमेय खोपकर यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी गुलाबराब पाटील यांची तुलना ‘गुलाब’ चक्रीवादळाशी केली आहे. संवेदनाहीन गुलाब चक्रीवादळ असं म्हणत खोपकर यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे.
अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली आहे. ‘गुलाब चक्रीवादळामुळं समजलं की गुलाबरावांच्या डोक्यात किती दुष्काळ आहे ते. राजसाहेब यांनी केलेली मागणी सध्याच्या परिस्थितीत अतिशय योग्य आहे, पण संवेदनाहीन ‘गुलाब’ना शेतकऱ्यांचं नुकसान कसं दिसणार? भ्रष्टाचाराचा महापूर आणि अकलेचा दुष्काळ असलेले नेते आपल्याला मिळाले हेच तर आपलं दुर्दैव आहे,’ अशा बोचऱ्या शब्दात खोपकर यांनी गुलाबराव पाटलांच्या टीकेच्या समाचार घेतला आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज ठाकरे यांनी नेमकी काय मागणी केली होती?
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं असून त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहंल होतं. पाहा त्या पत्रात नेमकी काय मागणी करण्यात आली होती.
‘महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे.’
ही वेळ आणीबाणीची, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा: राज ठाकरे
‘अशा वेळेस पंचनाम्यांचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला-शेतकऱ्याला 50,000 रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात तात्काळ द्यावी. आधी कोरोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टीने शेतकरी पार कोलमडला आहे, अशा वेळी निव्वळ आश्वासनं आणि शब्दांपेक्षा शीघ्र कृतीची गरज आहे.’
‘प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबर घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत केली जाईल, परंतु मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याएवढी ताकद आता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा आणि सत्वर पावलं टाकावीत. तसेच ही परिस्थिती बघता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी आग्रही मागणी मी ह्या पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे करत आहे.’ असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं.
ADVERTISEMENT