मोरबी : येथील पूल दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरु असलेल्या मोरबी सिव्हील हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. मात्र त्यापूर्वी या दौऱ्याच्या अनुषंगाने हॉस्पिटलमध्ये रात्री रंगरंगोटीचं काम सुरु असल्याचा आरोप काँग्रेस आणि आम आदमी पक्षानं केला आहे. काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी हा इव्हेंटबाजीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. तर आम आदमी पक्षाने हा फोटोशूटसाठी अट्टाहास सुरु असल्याचा आरोप करत टीका केली आहे. मोरबीचे आम आदमी पक्षाचे संभाव्य उमेदवार पंकजभाई राणसरिया यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन काम बंद पाडलं.
ADVERTISEMENT
पवन खेरा म्हणाले, सोमवारी रात्री मोरबीच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये रंगरंगोटीचं काम सुरु आहे. टाईल्स बदलण्याचं काम सुरु आहे. का? तर मंगळवारी सकाळी इथे पंतप्रधान मोदी भेट देणार आहेत. ही मानवनिर्मित आपत्ती मोरबीमध्ये घडली आहे. अनेकांच्या घरचा आधार हरपला आहे, अनेकांचे मृतदेह अद्यापही मिळालेले नाहीत. मात्र इव्हेंटमध्ये कोणतीही कमतरता राहायला नको. आज काँग्रेस पक्षाने आपल्या यात्रा स्थगित केल्या, पण पंतप्रधान मोदी यांनी मात्र त्यांचा इव्हेंट स्थगित केलेला नाही.
रविवारी रात्री मोरबी येथील मच्छू नदीवरील झुलता पूल पडल्याने मोठी दुर्घटना घडली. यात ४०० हून अधिक लोक नदीत पडले होते. यातील जवळपास १३० जणांचा मृत्यू झाल आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यांनी बचाव कार्यासाठी तात्काळ पथके तयार करण्याचे निर्देश दिले. तसंच मुख्यमंत्र्यांना स्वतः परिस्थितीवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्यास, बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनासकांठाच्या जाहीर सभेत बोलताना मोरबीच्या दुर्घटनेचा उल्लेख केला. यावेळी ते अतिशय भावूक झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांनी एक उच्चस्तरित बैठक घेऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला आणि पुढील सुचना दिल्या. दरम्यान, मंगळवारी सकाळी पंतप्रधान मोदी मोरबी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT