पिण्यासाठी पाणी काढताना शेततळ्यात पाय घसरून पडल्याने मायलेकींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बारामती तालुक्यातल्या अंजनगाव येथे घडली. पाण्यात पडलेल्या तिघींपैकी एक मुलगी सुदैवाने बचावली त्यामुळे दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.
ADVERTISEMENT
अश्विनी सुरेश लावंड, समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या दुर्दैवी घटनेत मयत झालेल्या मायलेकींची नावे आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी या आपल्या दोन मुलींसह शेतात बकऱ्या चारण्यासाठी जातात. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेततळ्यातून बाटली च्या मदतीने पिण्यासाठी पाणी काढायला समृद्धी शेततळ्याच्या बाजूला गेली होती.
त्यावेळी शेततळ्यात वापरलेल्या प्लास्टिक कागदावरून तिचा पाय घसरला मुलीला वाचवण्यासाठी अश्विनी यांनी प्रयत्न केला. त्यांचाही पाय घसरला आणि दोघी पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करणारी तिसरी मुलगी श्रावणी देखील पाण्यात पडली. तिघीही पाण्यात बुडाल्या. मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली आणि तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. मात्र ग्रामस्थ जमा होण्यापूर्वीच अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच बारामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. मात्र, मृतदेह शेततळ्यात असल्याने उद्योजक सुरेश परकाळे यांच्या पुढाकाराने साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथील आर्यनमॅन सतीश ननवरे, सुभाष बर्गे, महादेव तावरे यांच्या यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. सुभाष परकाळे, सुभाष वायसे या युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामती च्या सिल्वर ज्युबिली रुग्णालयात पाठवण्यात आले.
ADVERTISEMENT