सोलापूर : राज्यभर गाजलेल्या रिंकी-पिंकी अन् अतुल आवताडे यांच्या लग्नाचा मुद्दा थेट देशाच्या संसदेत पोहचला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी या लग्नाचा प्रश्न उपस्थित केला. दोन महिलांशी त्यातही एकाच वेळी एकाच मंडपात विवाह करणं हा हिंदू संस्कृतीसाठी धोका असल्याचं म्हणतं ज्यांनी हा प्रकार केला त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राणा यांनी केली.
ADVERTISEMENT
यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, भादंवि ४९४, ४९५ हे कायदे सध्या अस्तित्वात आहेत. पण एका व्यक्तीने एकाच मंडपात दोन मुलींशी विवाह करावा यासाठी कोणतेही प्रतिबंधात्मक कायदे नाहीत. त्यामुळे यासाठी कायदा तयार केला पाहिजे आणि सोलापूरमध्ये ज्यांनी हा प्रकार केला त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे.
आपल्या हिंदू संस्कृतीसाठी हा मोठा धक्का आहे. सोशल मिडियावरून हा सर्व विषय देशभरात व्हायरल झाला. युवक-युवतींवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय व्हावा. यापुढे असा प्रकार घडू नये आणि आपल्या संस्कृतीला गालबोट लागू नये, म्हणून कठोर कायदा तयार करण्याची आज गरज आहे. जेणेकरून पुन्हा कोणी असं धाडस करणार नाही, असंही त्या म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?
अतुल उत्तम आवताडे (रा. महाळुंग, गट नं-२) या तरुणाने ३ डिसेंबरला एकाच वेळी दोन जुळ्या बहिणींशी लग्न केलं. मुंबईतील कांदिवली येथील रिंकी आणि पिंकी या दोघींशी अतुलने लग्नगाठ बांधली. कायद्यानुसार हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचं दुसरं लग्न ग्राह्य मानलं जातं नाही, ते रद्दबातलं किंवा अवैध ठरवलं जातं.
तसंच संबंधित व्यक्तीवर गुन्हाही दाखल होतो. या प्रकरणात माळेवाडी येथील राहुल भारत फुले यांनी तक्रार देखील नोंदविली होती. त्यानुसार ‘अतुल उत्तम आवताडे’ विरोधात पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 494 नुसार NCR दाखल केला होता.
मात्र अतुल आवताडेवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची परवानगी सोलापूर न्यायालयाने नाकारली आहे. सदर खटल्यातील तक्रारदार हा पिडीत पक्ष म्हणजेच संबंधित कुटुंबातील सदस्य असावा. या खटल्यात तक्रारदार पीडित पक्ष नसल्याने या याचिकेची दखल घेऊ शकत नसल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT