मुंबई: कोरोनानंतर (Corona) आता म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) हा आजार वेगाने डोकं वर काढू लागला आहे. खरं तर हा संसर्ग रुग्णामध्ये अत्यंत झपाट्याने पसरत असून त्यामुळे अवघ्या काही दिवसात रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. अशावेळी या आजाराबाबतच्या नेमक्या गोष्टी वेळीच स्पष्ट झाल्या पाहिजेत यासाठी राज्य सरकारने आता पहिलं पाऊल उचललं आहे. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या एका टीमने आज (15 मे) एक वेबिनार घेऊन सविस्तर चर्चा केली. तसंच म्युकोरमायकोसिसच्या रुग्णावर एक शस्त्रक्रिया देखील केली जी लाइव्ह देखील दाखविण्यात आली.
ADVERTISEMENT
आज या वेबिनारला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी डॉक्टरांनी काही अडचणी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडल्या. यातील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे म्युकोरमायकोसिस आजार बरा करण्यासाठी ‘अॅम्फोटेरिसिन बी’ हे इंजेक्शन अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी याबाबत जर रेमडेसिवीरसारखा (Remdesivir) गलथानपणा झाला तर खूपच महागात पडू शकतं.
कोरोनावरील औषधांमुळे होणारा म्युकोरमायकोसिस आजार का ठरतोय घातक?
आजचं हे वेबिनार डॉ. आशिष भूमकर आणि डॉ. सतीश जैन यांच्या नेतृत्वात पार पडलं यावेळी डॉ. भूमकर यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, ‘ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे अशा रुग्णांनी जर शुगर वाढूच दिली नाही तर म्यूकोर गेलाच समजा. रोजच्या रोज शुगर वाढली नाही तर म्युकोर होणार नाही. हा आजार कसा हँडल करायचा हे आम्हाला माहिती आहे. कोरोना कसा हाताळायचा हे पूर्णपणे माहिती नाही. म्युकोरसंबंधी ऑपरेशन आम्ही करु पण अॅम्फोटेरिसिन बी (Amphotericin B) इंजेक्शनचा पूर्ण डोस नाही मिळाला तर पेशंट बराच होऊ शकत नाही. म्युकोरमायकोसिस आजार बरा करण्यासाठी ‘अॅम्फोटेरिसिन बी’ हे इंजेक्शन अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे याचा काळा बाजार होता नये.’
‘सध्या सध्या आम्हाला प्रायव्हेट किंवा छोट्या-छोट्या हॉस्पिटलमध्ये मिळत नाहीए. सगळे एकमेकांकडे मागत आहोत आणि आमच्या रुग्णांवर उपचार करत आहोत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत जसा गोंधळ झाला तसं अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनबाबत होऊ नये. कारण रेमडेसिवीर इंजेक्शन हे रुग्णांवर कधी काम करायचं कधी नाही करायचं. पण अॅम्फोटेरिसिन बी याचं तसं नाही. रेमडेसिवीरविना चालून गेलं पण अॅम्फोटेरिसिनविना अजिबात रुग्ण बरा होणार नाही. ते वेळेवरच दिलं पाहिजे.’ असं डॉ. भूमकर यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र कोरोनाने सावरतोय पण Black Fungus ने घेरलं, झपाट्याने वाढत आहेत रुग्ण
डॉ. भूमकर यांनी सांगितलेल्या एकूण परिस्थितीनंतर मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी अशी माहिती दिली की, मुख्यमंत्र्यांनी परवाच घेतलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या इंजेक्शन संबंधी योग्य ते निर्देश दिले आहेत.
दरम्यान, या सगळ्या चर्चेनंतर म्युकोरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस झालेल्या रुग्णावर नेमकी कशी शस्त्रक्रिया केली जाते याचं हे डॉक्टरांनी यावेळी लाइव्ह देखील दाखवलं.
ADVERTISEMENT