पॅलेस्टाइनमधील भारतीय राजदूत मुकुल आर्य यांचा मृत्यू झाला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. पॅलेस्टाईनमधील रामल्ला या ठिकाणी असलेल्या भारतीय दुतावासात त्यांचा मृतदेह आढळला आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याबाबत शोक व्यक्त केला आहे. मुकुल आर्य यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ADVERTISEMENT
पॅलेस्टाईन सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुकुल आर्य यांचा मृत्यू नैसर्गिक आहे की आणखी कोणत्या कारणामुळे झाला आहे? यामागे काही घातपात नाही ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तपासली जात आहेत. मुकुल आर्य हे 2008 च्या IFS बॅचचे अधिकारी होते.
काय म्हटलं आहे एस. जयशंकर यांनी?
‘पॅलेस्टाईनमधील भारतीय राजदूत मुकुल आर्य यांच्या निधनाचं वृत्त ऐकून मला धक्का बसला आहे. मुकुल आर्य हे अत्यंत हुशार आणि प्रतिभावान अधिकारी होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि सहकाऱ्यांच्या दुःखात मी देखील सहभागी आहे. ओम शांती’ असं म्हणत त्यांनी हे ट्विट केलं आहे.
पॅलेस्टाईनने काय म्हटलं आहे?
भारताचे राजदूत मुकुल आर्य यांचा मृत्यू नेमका किती वाजता झाला हे समजू शकलेलं नाही. मात्र रामल्ला येथील भारतीय दुतावासात त्यांचा मृतदेह आढळला. आमच्यासाठीही ही बातमी धक्कादायक आहे. आम्हाला ही बातमी समजली त्यानंतर आम्ही तातडीने भारतीय राजदूत मुकुल आर्य यांच्या घरी ती कळवण्याची व्यवस्था केली. इतकंच नाही तर हा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे की आणखी काही कारणामुळे याची सखोल चौकशीही आम्ही करणार आहोत असंही पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान पॅलेस्टाईन परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये भारतीय राजदूत मुकुल आर्य यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी आम्ही संपर्क ठेवून आहोत. मुकुल आर्य यांचे पार्थिव भारतात पाठवण्याच्या दृष्टीने आम्ही योग्य ती व्यवस्था करत आहोत असंही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती मेहमुद अब्बास, पंतप्रधान मोहम्मद शतेय यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसंच आरोग्य अधिकारी आणि फॉरेन्सिक अधिकारी यांना रामल्ला या ठिकाणी असलेल्या मुकुल आर्य यांच्या निवासस्थानी जाण्याचे निर्देश दिले आहेत. मुकुल आर्य यांच्या मृत्यूबाबत आणखी काही माहिती मिळत असेल तर ती घेण्यात यावी असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुकुल आर्य हे पॅलेस्टाईनमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत होते. मुकुल आर्य हे 2008 च्या परराष्ट्र सेवेतले अधिकारी होते. याआधी त्यांनी रशियातल्या मॉस्कोमध्ये आणि अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधल्या भारतीय दुतावासात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
ADVERTISEMENT