आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये लॉकडाऊन लावावा लागेल असं वक्तव्य केलं. याच दिवशी मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येने १५०० चा टप्पा ओलांडला आहे. दिवसभरात मुंबईत १५०८ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर चोवीस तासात चार मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाची लागण होऊन एकूण ११ हजार ५१५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी Lockdown करावा लागणार-उद्धव ठाकरे
आजच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातल्या ज्या शहरांमध्ये कोरोना वाढतो आहे त्या शहरांमध्ये आठ शहरं महाराष्ट्रातली आहेत असं सांगितलं आहे. कोरोनाच्या बाबतीतला निष्काळजीपणा हा कोरोना रूग्ण संख्या वाढण्यासाठी कारणीभूत ठरतो आहे असंच सध्याचं चित्र आहे.
Corona च्या बाबतीत बेफिकीरी महाराष्ट्राला पडली महागात, हे आहे कारण
मुंबईतल्या अॅक्टिव्ह कंटेन्मेंट झोनची संख्याही २५ वरुन २७ वर गेली आहे. मुंबईतली स्थिती अजूनही पूर्णपणे हाताबाहेर गेलेली नाही असं तात्याराव लहाने यांनी इंडिया टुडेशी बोलताना स्पष्ट केलं. मात्र कोरोना रूग्णसंख्या नियंत्रणात आणायची असेल तर आता लोकांनी अधिक काळजी घेणं, जबाबदारीने वागणं आवश्यक आहे. गर्दी होतील अशी ठिकाणं टाळली पाहिजेत, ज्या लोकांचं काहीही काम नाही त्यांनी प्रवास टाळला पाहिजे, मास्क लावला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. लोकांनी ऐकलं नाही किंवा गांभीर्य ओळखलं नाही तर पूर्ण लॉकडाऊन लावायचा की अंशतः लॉकडाऊन लागू करायचा याचा निर्णय सरकारचा असेल असंही लहाने यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत वाढत्या कोरोना रूग्णसंख्येबद्दल मुंबई महापालिकेनेही चिंता व्यक्त केली आहे. “आरोग्य सेवा पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही सज्ज आहोत मात्र आता आम्हाला लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. लोकांनी निष्काळजीपणा केला, कोरोना प्रतिबंधक नियमांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.” असं मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT