एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना, राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर आज संध्याकाळी साडेचार वाजता महत्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री रुग्णसंख्येवर आळा घालण्यासाठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष असेल. दरम्यान मुंबई लोकलबद्दल राज्य सरकार काय निर्णय घेणार याबद्दल सर्वसामान्यांना उत्सुकता होती. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल बंद होऊ देणार नाही असं म्हणत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
ADVERTISEMENT
वडेट्टीवार नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. “मुंबई लोकलच्या बाबतीत राज्य सरकारने याआधी वापरलेला फॉर्म्युला पुन्हा वापरण्याच्या विचारात आहे. चाकरमान्यांना, रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांना अशा सर्व प्रमुख घटकांना प्रवासाची वेळ ठरवून दिली जाईल. त्यामुळे लोकल बंद होणार नाहीत, त्यावर निर्बंध जरुर घातले जातील. लोकलमध्ये गर्दी न होता सर्वसामान्यांना त्याचा फायदा कसा होईल यासाठी नियोजन सुरु आहे.”
यावेळी बोलत असताना वडेट्टीवारांनी राज्यात पुन्हा लॉकडाउन लावणार का या महत्वाच्या प्रश्नाबद्दलही माहिती दिली. “लॉकडाउन लावायचं नाही हे महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांचं मत आहे. लॉकडाउन हे आता सर्वसामान्यांना परवडणारं नाही. त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, उद्योगधंदे सुरु राहिले पाहिजेत. कारण लॉकडाउन लागलं तर त्याचा राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम होईल. मागच्या वेळी केंद्राने कोणतीही पूर्वसुचना न देता लॉकडाउन लावलं आणि अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागला…अनेकांचे जीव गेले. तशी परिस्थिती आम्हाला राज्यात पुन्हा निर्माण करायची नाहीये.” लॉकडाउन न लावता पुन्हा कडक निर्बंध कसे लावले जातील याबद्दल विचार सुरु असल्याचंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन लागणार का? मुख्यमंत्र्यांची संध्याकाळी महत्वाची बैठक
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता महापालिका प्रशासन लवकरच मॉल आणि मंदिर बंद करण्याची शक्यता आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. आजपासून शहरात हे नवे निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता आहे. मुंबईत सध्याच्या घडीला ४ लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या रुग्णसंख्येकडे पाहता किशोरी पेडणेकर यांनी शहरात नव्याने निर्बंध लागू करण्याबद्दलचे संकेत दिले आहेत. शहरात एकीकडे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत असताना लोकं अजुनही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणं थांबवत नाहीयेत. शुक्रवारी दादरच्या भाजी मार्केट परिसरात अशा पद्धतीने गर्दी जमा झाली होती.
शहरातील हॉटेल्समध्ये यापुढे एकूण क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच संधी दिली जाऊ शकते. तर शहरातील सर्व धार्मिक स्थळं यापुढे बंद करण्यात येऊ शकतात. महापालिका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करुन लोकं गर्दी करत असल्याचं किशोरी पेडणकेर यांनी म्हटलंय. मुंबईतला लोकल प्रवास हा पहिल्याप्रमाणे फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांपुरता मर्यादीत केला जाऊ शकतो. याव्यतिरीक्त शहरातील मॉल, थिएटरही पूर्णपणे बंद केली जाऊ शकतात. याव्यतिरीक्त खासगी कार्यालयांमध्ये लोकांना दोन शिफ्टमध्ये काम करण्यासाठी सांगितलं जाण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT