मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे यांच्यात आज (29 नोव्हेंबर) तब्बल तासभर एका खोलीत चर्चा झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे आता या भेटीची मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे दोघेही चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते. याच दरम्यान, दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. दरम्यान, आता मुंबई पोलीस या गोष्टीचा तपास करत आहेत की, ही भेट नेमकी कोणाच्या परवानगी झाली.
दरम्यान, सचिन वाझे आणि परमबीर सिंग हे एक खोलीत बसून तब्बल तासभर चर्चा करत असल्याची बातमी समोर आली तेव्हा मुंबई पोलिसात देखील एकच खळबळ माजली. ज्यानंतर मुंबई पोलिसांची एक टीम तात्काळ चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहचली आणि त्यांनी या भेटीबाबत तपास सुरु केला.
मुंबई पोलिसांना हेच जाणून घ्यायचं आहे की, या दोन्ही आरोपींना एकमेकांना भेटण्यासाठी नेमकी कोणी परवानगी दिली होती. जर त्यांना भेटण्याची परवानगी नव्हती तर मात्र, मुंबई पोलीस आता त्यांच्या भेटीची स्वतंत्रपणे चौकशी करु शकतं. याच दरम्यान, सचिन वाझेला जेलमधून आयोगासमोर हजर करणाऱ्या पथकाची देखील चौकशी केली जाऊ शकते.
नेमकं काय घडलं?
परमबीर सिंग आणि सचिन वाझे हे एका खोलीत सुमारे तासभर एकमेकांशी बोलत होते त्यामुळे न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर अनिल देशमुख यांच्या वकिलाने या गोष्टीला जोरदार आक्षेप घेतला होता. ही बातमी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली जे नंतर न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांकडे याप्रकरणी तपास करण्यास सांगितलं आहे.
वाझे हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून सिंग आणि वाझे याच्याविरुद्ध गोरेगाव येथे दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यातही तो आरोपी आहे.
ठाणे तपास पथकाकडून परमबीर सिंग यांची सात तास चौकशी, नोंदवला चार पानी जबाब
परमबीर सिंग यांनी याच वर्षी मार्च महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा अत्यंत गंभीर आरोप केला होता. परमबीर सिंग यांनी पत्रात असा आरोप केला होता की, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं.
दरम्यान, सचिन वाझे प्रकरणात हलगर्जीपणा केल्यामुळे पोलीस आयुक्त पदावरुन हटवून होमगार्डचे डीजी करण्यात आलं होतं. दरम्यान, मे महिन्यानंतर परमबीर सिंग हे आपल्या कार्यालयात दिसलेच नव्हते. त्यानंतर अनेक महिन्यांनी परमबीर सिंग हे मुंबईत परतले. त्यानंतर आता त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT