मिथिलेश गुप्ता, डोंबिवली
ADVERTISEMENT
कल्याण-शीळ रोडवरील काटई नाका परिसरात आज (18 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास मुंबई रेल्वे पोलिसांच्या गाडीने पेट घेतल्याची घटना घडली. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मुंबई रेल्वे पोलिसांची व्हॅन कल्याण-शीळ रोड काटई नाका येथून कल्याणच्या दिशेने येत होती. यावेली या व्हॅनमध्ये गाडी चालकासह आरपीएफचे तीन जवान होते. याच दरम्यान गाडीला आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तात्काळ गाडीबाहेर पळ काढला. त्यामुळे हे तिघेही सुखरुप बचावले.
काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं. आगीमुळे गाडीमध्ये असणारे प्रचंड फटाके फुटत होते. ही सगळी दृश्य अनेकांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत.
दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र, या आगीत व्हॅनचे मात्र प्रचंड नुकसान झाले आहे. या दुर्घटनेमुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गाडीत काही बिघाड झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पण गाडीत असणाऱ्या फटाक्यांमुळे या आगीने अधिक रौद्र रुप धारण केलं. ज्यामुळे काही मिनिटांमध्ये संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली.
फटाक्यांच्या भरलेल्या पोलिसांच्या या व्हॅनचा नंबर MH-05-P118 हा असून या गाडीत फटाके असल्याने काही क्षणातच गाडीने पेट घेतला असे स्थानिक नागरिक आणि या मार्गावरुन प्रवास करण्यांनी सांगितलं.
आग लागली तेव्हा व्हॅनमधून 10 ते 12 फटाक्यांचे बॉक्सही बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दिवाळी आधीच या पोलिसांच्या व्हॅनमध्ये फटाक्यांचा स्टॉक नेमका कुठे चालला होता? असा सवाल आता विचारला जात आहे.
सदरची व्हॅन कल्याणकडे येत असताना अचानक पेट घेतला, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा जखमी देखील झाले नाही. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच केडीएमसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आणि तात्काळ आग विझवली.
पुणे-सातारा मार्गावर ट्रॅव्हल्स बस अचानक आग; सुदैवाने जीवित हानी टळली
यावेळी मानपाडा पोलीस आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील घटनास्थळी पोचले होते. त्यांनी देखील नेमकी घटना काय घडली याची माहिती घेतली.
दरम्यान, मुंबईतील ही गाडी नेमके कुठे चालली होती आणि त्यातून फटाके का नेले जात होते हो प्रश्न अनुत्तरितच आहे. याप्रकरणी आता मुंबई रेल्वे पोलीस काय उत्तर देतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT