Mumbai Rains दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा पाऊस पडतो आहे. 9 जूनला झालेल्या पावसानंतर मुंबईत ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. आता दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा कोसळण्यास सुरूवात केली आहे. बुधवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली असून सखल भागांमध्ये पाणीही साठलं आहे. विविध भागांमध्ये पाणी साठल्याने मुंबईत वाहतूक कोंडी झाली.
ADVERTISEMENT
वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न एक्स्प्रेस हायवे या दोन्ही ठिकाणी वाहनांच्या रांगा पाहण्यास मिळाल्या. विविध भागांमध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहण्यास मिळालं. सकाळपासूनच वाहनांची गर्दी झाल्याने ट्रॅफिक जाम पाहण्यास मिळालं. अनेक चाकरमान्यांना भिजतच ऑफिस गाठावं लागलं किंवा इच्छित स्थळी पोहचावं लागलं.
आज संध्याकाळी 4 वाजता समुद्राला भरती येणार आहे. दरम्यान हवामान विभागाने ठाणे, पालघर, रायगड, कोकण आणि मराठवाडा या ठिकाणीही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईतल्या अनेक भागांमध्ये सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत आहेत.
मुंबई, ठाणे आणि कोकण या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 17 आणि 18 जून या दोन दिवशी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असं सांगण्यात आलं आहे. तर 80 ते 100 मिमि पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन कृषी खात्याने केलं आहे.
जून महिना अर्धा संपला आहे तरीही समाधानकारक म्हणावा असा पाऊस पडलेला नाही त्यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत. आज जळगावमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस झाला त्यामुळे बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT