बोगस कर्जवाटप प्रकरणात सहकार विभागाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर बोगस मजूर प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकर यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई सत्र न्यायालयाने दरेकरांना सोमवारपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
ADVERTISEMENT
प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून मुंबई बँकेची निवडणूक लढवत आले आहेत. यावेळीही त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली, मात्र निवडणुकीच्या धामधुमीतच त्यांच्या मजूर असण्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापतींकडे तक्रार केली होती. तर दुसरीकडे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं होतं.
राणेंनंतर प्रविण दरेकरांच्या अडचणी वाढल्या; मुंबै बँक कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश
त्यानंतर मुंबै बँक निवडणुकीत प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले आणि त्यांच्या सहकार पॅनेलचाही विजय झाला होता. निकालानंतर प्रविण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र घोषित केलं होतं. विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दरेकर हे मजूर म्हणून अपात्र असल्याचा आदेश काढला होता.
सहकार विभागाने दरेकर यांना अपात्र घोषित केल्यानंतर ‘आप’चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. १५ मार्च रोजी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात दरेकरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळत त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले होते.
मुंबै बँक : प्रविण दरेकर ‘मजूर’ नाहीत; निवडून आल्यानंतर सहकार विभागाचा दणका
अखेर आज प्रविण दरेकर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. मुंबई सत्र न्यायालयात सोमवारी याचिकेवर सुनावणी होणार असून, न्यायालयाने तोपर्यंत दरेकर यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे.
ADVERTISEMENT