ठाणे: अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे दिले असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. फेरीवाल्याच्या हल्ल्यात आपली दोन बोटे गमवावी लागलेल्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची त्यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे.
ADVERTISEMENT
ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या काल (30 ऑगस्ट) संध्याकाळी माजिवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमरजीत यादव या फेरीवाल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले आहे. त्यानंतर त्याना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
दरम्यान, रात्री उशिरा नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांचा उपचाराचा सर्व खर्च महानगरपालिकेतर्फे केला जाईल याबाबतही त्यांनाआशवस्त करण्यात आले.
अधिकाऱ्यांवर त्यातही महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची अशी ही शहरातील पहिलीच घटना असून ती अतिशय निंदनीय असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसून या प्रकरणातील दोषी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील फेरीवल्याविरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्या कारवाईला खीळ बसावी यासाठी उद्विग्नतेतून अशी घटना घडली असल्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं तरीही ही कारवाई मागे न घेता यापुढेही अनधिकृत फेरीवाल्याविरोधात धडक कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा, इतर पालिका अधिकारी उपस्थित होते.
ठाणे : ‘त्या’ महिला अधिकाऱ्याची प्रकृती स्थिर, आरोपीला अटक
संपूर्ण प्रकरण काय आहे?
ठाण्यात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहआयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करुन त्यांची बोटंच छाटली.
अमरजीत यादव असं या हल्लेखोर फेरीवाल्याचं नाव असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली. त्याच्या जवळचा चाकूही पोलिसांनी हस्तगत केला आहे. हा हल्ला एवढा भयंकर होता की घटनास्थळी असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांना देखील घडकी भरली होती.
आरोपी अमरजीत यादव हा मूळचा बिहारचा असून तो ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात राहतो. याआधीही 3 वर्ष अगोदर अमरजीतने अशाच प्रकारे हल्ला केला होता. सध्या आरोपीला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.
ठाण्यात महिला सहाय्यक उपायुक्तांची बोटं छाटली; फेरीवाल्यांवरील कारवाईवेळची भयंकर घटना
ठाणे महापालिकेच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत बांधकामे तसेच फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर अतिक्रमण विरोधी पथकामार्फत प्रभाग समितीनिहाय अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर धडक कारवाई सुरु असून शहरात विविध ठिकाणी कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे.
दरम्यान घोडबंदर रोड येथे सोमवारी संध्याकाळी अशीच कारवाई सुरू असताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अमरजीत यादव या भाजीपाला विक्रेत्याने जीवघेणा हल्ला केला. ज्यामध्ये कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे छाटली गेली आहेत.
ADVERTISEMENT