२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि त्यानंतर महाराष्ट्रात झालेले दोन प्रयोग आजही लोकांच्या लक्षात आहेत. पहिला प्रयोग होता पहाटेचा शपथविधी. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. एका रात्रीत राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उठवून या दोघांना शपथ दिली, मात्र हे सरकार पडलं. त्यानंतर प्रयोग झाला तो महाविकास आघाडीचा. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झालं होतं जे अडीच वर्ष चाललं.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला अभूतपूर्व प्रयोग
महाविकास आघाडी हा महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला अभूतपूर्व प्रयोग होता हे सत्य कुणीही नाकारणार नाही. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढली गेली असे दोन पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रयोगामुळे सत्तेत आले. शिवसेना आणि भाजपचं मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे वाटून घेण्यावरून वाजलं. तडजोडी होतील असं वाटत असतानाच या दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला आणि महाविकास आघाडी जन्माला आली.
महाविकास आघाडीचा प्रयोग होण्यासाठी दोन-तीन नाही तर तब्बल ३६ दिवस लागले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षांची मोट बांधण्याचं काम दोघांनी केलं. पहिले होते शरद पवार आणि दुसरे होते संजय राऊत. ३६ दिवस चर्चेच्या फेऱ्या, बैठकांची सत्रं चालली. त्यानंतर किमान समान कार्यक्रम तयार झाला आणि महाविकास आघाडी स्थापन होत मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान झाले.
महाविकास आघाडीमध्ये ३६ दिवसात दुरावाही आला
राज्यात २१ जूनला एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदारही गेले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं. मात्र महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मोट कायम होती. याच महाविकास आघाडीत दुरावा निर्माण व्हायलाही ३६ दिवस लागले.
३६ दिवसांमध्ये महाविकास आघाडीत दुरावा कसा येत गेला?
महाविकास आघाडी सरकार कोसळलं, त्यानंतर तिन्ही पक्षांची एकत्र म्हणजेच महाविकास आघाडीची सरकार गेलं तरीही एकही पत्रकार परिषद झाली नाही. ही बाब दुरावा येण्याची सुरूवात ठरली.
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आहे पण मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशनही लांबलं आहे. अधिवेशनाची मागणी, अतिवृष्टीच्या मुद्द्यावर एकटे अजित पवारच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. इतर दोन पक्षांमधलं कुणीही त्यांच्यासोबत नव्हतं.
उद्धव ठाकरेंनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा सरकार आपोआपच कोसळलं, यावर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तीव्र नाराजी दर्शवली
शिवसेनेत पडलेल्या फुटीवर ज्याचा परिणाम थेट सरकारवर झाला, पण आक्रमक रित्या मविआची ताकद राज्यात दिसली नाही.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात अटक झाली. मात्र त्यांच्या अटकेवरही मोघम प्रतिक्रिया समोर आल्या. शरद पवारांचं या अटकेवर मौन दिसून येतं आहे. उद्धव ठाकरेंप्रमाणे ते संजय राऊत यांच्या घरी जाऊ शकले असते पण ते अजूनही गेलेले नाहीत. असते
उद्धव ठाकरेंनी वर्षा हे निवासस्थान सोडलं, त्यानंतर शरद पवार मातोश्रीवर गेले होते. त्या भेटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ना मातोश्रीवर भेट झाली नाही किंवा सिल्वर ओकवरही भेट झाली नाही.
ही कारणं लक्षात घेतली तर ३६ दिवसातच महाविकास आघाडीमध्ये दुरावा कसा निर्माण झाला ते आपल्या लक्षात येतं आहे. किमान समान कार्यक्रमावर ही महाविकास आघाडी तयार झाली होती. मात्र ती दुरावताना कुठलाही कार्यक्रम त्यांनी हाती घेतला नाही त्यामुळेच त्यांच्यातला दुरावा जास्त गडद झाला.
ADVERTISEMENT