नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांच्या गळ्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिला आहे. पक्षाने मला आदेश दिले होते त्यानंतर मी विधानसभा अध्यक्ष झालो होतो. ही खुर्ची मी जनतेची खुर्ची केली याचा मला अभिमान आहे असंही नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटलं आहे. आताही पक्षाने मला सांगितलं आहे की तुम्ही विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्या त्या आदेशानुसार मी माझा राजीनामा दिला आहे.
ADVERTISEMENT
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा देण्यात आला आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाना पटोले यांचं नाव सर्वात घाडीवर त्यामुळे नाना पटोले यांनी हा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. बुधवारीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नाना पटोले यांनी भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी नरहरी झिरवळ यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
नाना पटोले यांना जेव्हा विधानसभा अध्यक्ष करण्याचा निर्णय झाला तेव्हा महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी अर्थात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकमताने त्यांच्या नावाला सहमती दर्शवली होती. आता नाना पटोलेंनंतर कुणाला विधानसभा अध्यक्ष केलं जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवड केली जाईल तेव्हा महाविकास आघाडीला एका अर्थाने परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे.
ADVERTISEMENT