काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईतील मालवणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. ९ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर राणे यांनी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला. त्यानंतर सोडण्यात आलं,” असं म्हटलं होतं. राणे यांनी खोटा दावा केला असल्याचं आता पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नारायण राणे यांनी भाष्य करताना तिने आत्महत्या केलेली नाही. तिची बलात्कार करून हत्या करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अभिनेता सुशांत सिंह राजपूतचीही हत्या करण्यात आलेली आहे, असा आरोप राणेंनी केला होता.
या प्रकरणी दिशा सालियनच्या आईने मालवणी पोलिसांत तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. दरम्यान नारायण राणे आणि नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी दिंडोशी सत्र न्यायालयात अर्ज केलेला असून, पोलिसांनी अटकपूर्व जामीनाला विरोध केला आहे. त्याचबरोबर राणे पितापुत्राला पोलीस कोठडीची मागणी केली आहे.
अटकपूर्व जामीनाला विरोध करण्यामागील कारणं पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली आहे. यात एक कारण नारायण राणे खोटं बोलल्याचंही आहे.
पोलिसांनी न्यायालयाला काय सांगितलं?
“आरोपींना ५ मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आरोपी हजर राहिले, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही. आपल्याकडे असलेली माहिती आपण सीबीआयला देऊ अशी खोटी विधानं वारंवार केली. तसेच चौकशी संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना चौकशी दरम्यान फोन केला होता, असं धडधडीत खोटं विधान केलेलं आहे.”
“आरोपींच्या सदरील बोलण्याचा रोख साक्षीदारांवर आणि तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतो. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण करीत आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन दिल्यास ते भविष्यात तपासात कोणतंही सहकार्य करणार नाही,” असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे.
नारायण राणे आणि नितेश राणे यांचा अटकपूर्व फेटाळून लावण्यात यावा आणि त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, यासाठी पोलिसांनी न्यायालयासमोर २६ कारणं सांगितली आहेत. त्यात दिशा सालियन प्रकरणाबरोबरच त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही उल्लेख करण्यात आलेला आहे.
ADVERTISEMENT