SitabaiChi Misal : ‘तर्रीदार’ मिसळ बनवणाऱ्या नाशिकच्या सीताबाईंचं निधन, मिसळप्रेमींमध्ये हळहळ

मुंबई तक

• 04:58 AM • 11 Aug 2021

नाशिक आणि मिसळ यांचं एक वेगळंच नातं आहे. तर्रीबाज, ठसकेबाज, चमचमीत मिसळ ही इथली खासियत. जसे पुण्यात मिसळप्रेमी आहेत तसेच नाशिकमधेही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच नाशिकमध्ये फक्कड मिसळ मिळणारी आणि खव्वय्यांच्या जीभेवर मिसळीची चव रेंगाळायला लावणारी अनेक ठिकाणं आहेत. त्यातलीच एक खास ओळख म्हणजे सीताबाईंची मिसळ. सीताबाईची मिसळ ही नाशिकमध्ये गेल्या 75 वर्षांपासून मिळते. सीताबाईची […]

Mumbaitak
follow google news

नाशिक आणि मिसळ यांचं एक वेगळंच नातं आहे. तर्रीबाज, ठसकेबाज, चमचमीत मिसळ ही इथली खासियत. जसे पुण्यात मिसळप्रेमी आहेत तसेच नाशिकमधेही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच नाशिकमध्ये फक्कड मिसळ मिळणारी आणि खव्वय्यांच्या जीभेवर मिसळीची चव रेंगाळायला लावणारी अनेक ठिकाणं आहेत. त्यातलीच एक खास ओळख म्हणजे सीताबाईंची मिसळ. सीताबाईची मिसळ ही नाशिकमध्ये गेल्या 75 वर्षांपासून मिळते. सीताबाईची मिसळ ही ओळख निर्माण करणाऱ्या आजींचं म्हणजेच सीताबाईंचं नाशिकमध्ये निधन झालं आहे. सीताबाईंच्या जाण्याने कुटुंबीय आणि आप्तस्वकियांसह मिसळप्रेमीही हळहळले आहेत.

हे वाचलं का?

वृद्धापकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी सीताबाई मोरे यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. जवळपास 75 वर्ष त्यांनी खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मिसळच्या रुपाने नाशिकच्या खाद्य संस्कृतीला सीताबाईंनी नवीन ओळख मिळवून दिली होती. नाशिकची मिसळ नगरी अशी ख्याती होण्यामागेही त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे.

मिसळवाल्या आजी अशी सीताबाई यांची ख्याती होती. नाशिककर माणसाने सीताबाईची मिसळ खाल्ली नाही असं कधी झालंच नाही. जुन्या नाशिकमधून त्यांनी त्यांच्या मिसळ व्यवसायाला सुरूवात केली होती. त्यानंतर पूर्ण नाशिकमध्ये त्यांच्या हातच्या मिसळीची ख्याती पसरली. थोड्यात काळात सीताबाईची मिसळ फेमस झाली. मिसळ अजरामर करणाऱ्या सीताबाई आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

सीताबाईंनंतर नाशिकमध्ये उदयास आलेल्या अनेक मिसळ विक्रेत्यांची चव सीताबाईंच्या मिसळीच्या चवीपुढे फिकीच पडली. पतीच्या आजारपणामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी हा पर्याय निवडला. मिसळ व्यवसायावर त्यांनी आपली तीन मुलं आणि एका मुलीचे पालनपोषण केले. आज नातवंड-पतवंडांच्या जन्मानंतरही स्वतः सीताबाई हॉटेलात कार्यरत असायच्या. सीताबाईंच्या मिसळीचा ब्रँड तयार झाला असून नाशिकमध्येच त्यांच्या तीन शाखा सुरु झाल्या आहेत. सीताबाई या जरी आता हयात नसल्या तरीही त्यांच्या मिसळीची चव तशीच राहणार आहे कारण त्यांचे नातू आणि पणतूही याच व्यवसायात आहेत. त्यांनी नव्या तीन शाखा सुरू केल्या आहेत. त्यामुळे सीताबाईची मिसळ आवर्जून मिसळप्रेमींना खाता येणार आहे. या मिसळीची चव जीभेवर ठेवता येणार आहे.

    follow whatsapp