NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी मोठी खळबळ उडवून दिली. समीर वानखेडेंचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप करत त्यांच्या धर्मपरिवर्तनाचा मुद्दाही नवाब मलिकांनी मीडियासमोर आणला. या सर्व घडामोडींनंतर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे आपली तक्रार केली आहे.
ADVERTISEMENT
मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी आज समीर वानखेडेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्येही सविस्तर चर्चा झाली असून हलदर यांनी नवाब मलिकांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलंय. एक चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यामागे नवाब मलिक का लागले आहेत हे कळायला हवं असं हलदर म्हणाले आहेत. माझ्या अनुभवावरुन समीर वानखेडे यांनी दाखवलेलं जात प्रमाणपत्र योग्य असल्याचंही हलदर यांनी सांगितलं.
समीर वानखेडे यांनी शनिवारी अरुण हलदर यांची भेट घेऊन आपली तक्रार दाखल केली होती. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जात आणि धर्मावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन समीर वानखेडेंना लवकरच तुरुंगात पाठवणार अशी घोषणा केली होती. इतकच नव्हे तर समीर वानखेडे हे बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर प्रशासकीय सेवेत लागल्याचा आरोपही मलिक यांनी केला होता.
दरम्यान, वानखेडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मागासवर्ग आयोगाने चौकशीला सुरुवात केली आहे. प्राथमिक पातळीवर हे प्रमाणपत्र योग्यच असल्याचं दिसतंय. काही लोकं हे मुद्दाम समीर वानखेडे यांचं प्रमाणपत्र बोगस असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आयोग कोणत्याही दबावाखाली न येता पूर्ण चौकशी करेल. जर कोणीही समीर वानखेडेंवर दबाव टाकून त्यांचं प्रमाणपत्र बोगस दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाईल असं हलदर म्हणाले.
आज झालेल्या बैठकीत, समीर वानखेडे यांनी या तपासादरम्यान आपल्या परिवाराला धमक्या मिळत असल्याचंही हलदर यांना सांगितलं. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे नवीन काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT