नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसा पठणाची भूमिका घेऊन मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याला थेट तुरुंगात जावं लागलं होतं. जवळजवळ 12 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर सुटलेले राणा दाम्पत्य हे पुन्हा एकदा हनुमान चालीसाचा पठण करणार आहेत. ते देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील सभेच्या दिवशी. स्वत: आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे.
ADVERTISEMENT
हनुमान चालीसा पठणावरुन मुंबईत झालेला एकूणच राडा आणि त्यानंतर झालेली अटकेची कारवाई यानंतरही राणा दाम्पत्य आपल्या भूमिकेवर ठाम आहे. मात्र, आता राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा पठणासाठी थेट दिल्ली गाठली आहे. मुख्यमंत्री सभेच्या दिवशीच राणा दाम्पत्य हे दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिरात आरती करुन हनुमान चालीसाचं पठण करणार आहेत. याबाबतची घोषणा करताना राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका केली आहे.
पाहा नवनीत-रवी राणांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर नेमकी काय टीका केलीय?
‘बाळासाहेबांनी हिंदुत्व मजबूत करण्यासाठी काम केलं. पण तुम्ही इंग्रजांनी तयार केलेल्या कायद्याचा वापर करुन जे लोकं धर्माचा प्रचार करतात, बजरंग बली, रामाचं नाव घेतात त्या निष्पक्ष लोकांना तुम्ही जेलमध्ये टाकायचं काम करत आहात.’
‘तुम्ही सत्तेच्या लोभापायी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, मोदींजींचं नाव घेऊन ज्या पद्धतीने तुम्ही मतं मागितली त्यामुळे लोकसभेत तुमचे खासदार आले. विधानसभेत तुमचे आमदार आले. ते कशामुळे आले तर.. मोदीजींचा मोठा फोटो लावला होता. त्यांच्या नावावर मतं जमा केली.’
‘जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आली होती, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची वेळ आली होती. तेव्हा तुम्ही भाजपला धोका देऊन त्या ठिकणी पळ काढून आघाडी बनवून स्वत: मुख्यमंत्री झाले तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराची हत्या केली.’
‘यामुळेच 14 तारखेला तुम्ही जी सभा घेणार आहात. नेहमी उद्धव ठाकरे सभा घेतात तेव्हा नेहमी हेच म्हणतात आम्ही मर्द आहे. अरे पण बाळासाहेब वरुन पाहत असतील तेव्हा.. एका मागासवर्गीय खासदार महिलेला जेलमध्ये टाकलं ही उद्धव ठाकरेंची मर्दांनगी नाहीए. त्यांनी नामर्दांगी सारखं काम केलं आहे.’
’14 तारखेला जी सभा आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेसाठी आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्ही दिल्लीतील प्राचीन हनुमान मंदिर आहे तिथे आम्ही शनिवारी 9 वाजता आरती करणार आहोत, हनुमान चालीसाचं पठण करणार आहोत.’
नवनीत-रवी राणा विरोधातील राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा, कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं
‘महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही 14 तारखेला हनुमान चालीसेचं वाचन आणि महाआरती दिल्लीत करणार आहोत. त्याठिकाणी मला असं वाटतं की, महाराष्ट्राच्या सुख-शांतीसाठी हनुमानचं नाव घेण्याची गरज पडली आहे. पण त्याच्या विरोध राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे.’ अशी टीकाच राणा दाम्पत्याने यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
ADVERTISEMENT