मुंबई: एनसीबीतले दबंग अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समीर वानखेडे यांनाच आता अटकेची भीती सतावतेय का? असा सवाल निर्माण झाला. मला चुकीच्या पद्धतीनं अडकवण्याचा कट रचला जातो आहे, माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणत वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे.
ADVERTISEMENT
एक पत्र लिहून वानखेडेंनी आपली भीती बोलून दाखवली आहे. या पत्रात काय म्हटलं, पत्राचं टायमिंग काय आणि हे संपूर्ण प्रकरण काय, तेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
सेलिब्रिटींविरोधात अंमली पदार्थविरोधी कारवायांमुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे नेहमी प्रकाशझोतात असतात. पण क्रूझवरील ड्रग्स प्रकरणामुळे मात्र ते वादात सापडले आहेत. त्यांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कारवाईभोवती संशय निर्माण करणारी वेगवेगळी माहिती रोजच समोर येते आहे. अशातच आता समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना लिहिलेल्या पत्रात समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणाचा संदर्भ दिला आहे.
या प्रकरणाच्या अनुंषगानेच आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला जातो आहे. असं समीर वानखेडे सांगतात.
त्यांनी आपल्या पत्रात असं म्हटलं आहे की, ‘माझ्या निदर्शनास आलंय की, अज्ञात व्यक्तींकडून माझ्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. तसंच काही कायदेशीर कारवाईची योजनाही आखली जातेय. मला तुरुंगात टाकण्याची आणि बडतर्फीची धमकीही देण्यात आली आहे. हेही तुमच्या निदर्शनास आणून देत आहे.’
‘ड्रग्ज प्रकरणात झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी NCB पोलीस महासंचालकांना माझ्या वरिष्ठांनी पत्र पाठवलं आहे. मला जेलमध्ये टाकण्याची आणि सेवेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे वाईट हेतूने माझ्यावर कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करावी.’
एक प्रकारे एनसीबीचे दबंग अधिकारी असलेल्या समीर वानखेडे यांनी संभाव्य कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणीच मुंबई पोलिसांकडे केली आहे.
समीर वानखेडे यांनी लिहिलेल्या पत्राचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे. आर्यन खान प्रकरणातील क्रमांक एकचा साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईल यांनी खळबळजनक दावे केले आहेत. प्रभाकर हा आर्यन प्रकरणातील एक पंच असलेल्या केपी गोसावीचा बॉडीगार्ड आहे.
प्रभाकरने आपल्या जीवाला समीर वानखेडेंपासून धोका असल्याचा दावा केला होता. एवढंच नाही, आर्यन प्रकरणात गोसावीने मध्यस्थामार्फत 25 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि यातले आठ कोटी समीर वानखेडेंचे होते, असा दावा प्रभाकरने मुंबई तकला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला.
या आरोपांमुळे वानखेडे अडचणीत सापडले आहेत. या गंभीर आरोपानंतर रविवारी सायंकाळीच वानखेडेंनी एनसीबीच्या लेटरहेडवर पोलिसांना पत्र लिहिलं आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी गैरप्रकारांमुळे समीर वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात जावं लागेल, नोकरीही जाईल, असा दावा केला होता. त्यावेळी वानखेडे यांनी देशसेवेसाठी तुरुंगातही जाण्याची आपली तयारी, असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
वानखेडे यांनी आपल्या पत्रातही नाव न घेता मलिकांच्या दाव्यांचा उल्लेख केला आहे. त्यानंतरच महाविकास आघाडी सरकार वानखेडेंविरोधात कारवाई करणार का? असा सवाल निर्माण झाला होता. पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वानखेडेंविरोधात चौकशीचा कोणताही विचार नसल्याचं चार दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना स्पष्ट केलं होतं.
मात्र, आता प्रभाकर साईलच्या गंभीर आरोपांमुळे मुंबई पोलीस कथित भ्रष्टाचाराची, खंडणी वसुलीची चौकशी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रभाकरने आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हणत मुंबई पोलिसांत धाव घेतली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. नाना पटोले यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, असं म्हटलं आहे.
NCB: समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ, ‘त्या’ आरोपानंतर खात्यातंर्गत चौकशी सुरु
याच सगळ्या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी संभाव्य कारवाईपासून संरक्षण मागितलं आहे. दुसरीकडे कोर्टातही धाव घेतली आहे. मुंबई सेशन्स कोर्टात स्वतंत्र प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.
आपल्यावरील आरोप खोटे असल्याची माहिती त्यांनी कोर्टाला दिली आहे. याशिवाय प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांची माहिती देणारं आणि त्यांनी त्यांची साक्ष फिरवल्याचा दावा करणारं वेगळं प्रतिज्ञापत्र NCBनं कोर्टात सादर केलं आहे.
त्यामुळेच आतापर्यंत समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातल्या आरोप प्रत्यारोपांपुरतं मर्यादित असलेल्या आर्यन खान प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.
आरोपांनुसार नव्या कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या सगळ्यात मुंबई पोलीस काय भूमिका घेतात, कोणती कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT