Ramdas Kadam: “तेल लावलेला पैलवान शिवसेनेचं भलं करणार नाही हे उद्धव ठाकरेंनी ओळखावं”

मुंबई तक

• 08:27 AM • 19 Jul 2022

रामदास कदम यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली. तसं पत्रच त्यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर मुंबई तकशी संवाद साधत रामदास कदम यांनी आपली भूमिका मांडली. मी स्वतःहून शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आहे. माझी हकालपट्टी कशी काय करता? हे काय गणित आहे मला कळलं नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तसंच शरद पवारांनी शिवसेनेला सुरूंग […]

Mumbaitak
follow google news

रामदास कदम यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली. तसं पत्रच त्यांना देण्यात आलं आहे. त्यानंतर मुंबई तकशी संवाद साधत रामदास कदम यांनी आपली भूमिका मांडली. मी स्वतःहून शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला आहे. माझी हकालपट्टी कशी काय करता? हे काय गणित आहे मला कळलं नाही, असं रामदास कदम यांनी म्हटलंय. तसंच शरद पवारांनी शिवसेनेला सुरूंग लावला असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तेल लावलेला पैलवान शिवसेनेचं भलं करणार आहे का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हे वाचलं का?

शिवसेना फुटत असताना उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या रामदास कदम यांचा राजकीय प्रवास कसा आहे?

शरद पवार शिवसेनेचं भलं का करतील? हे वेळेवर उद्धव ठाकरेंनी ओळखलं पाहिजे

शरद पवारांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा देत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. मात्र सोनिया गांधी आणि शरद पवार यांनी मिळून शिवसेनेचा एक-एक आमदार कसा संपेल तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आमदार कसा निवडून येईल त्याची मोर्चेबांधणी मागच्या अडीच वर्षात केली. जो आमदार पडला आहे त्याला निधी द्यायचा आहे जो आमदार झाला आहे शिवसेनेचा त्याला पैसा नाही. आमदार बोलून बोलून थकले. एकनाथ शिंदे यांनीही बऱ्याचदा उद्धव ठाकरेंशी बोलणं केलं, कसा अन्याय आमदारांवर होतोय ते सांगितलं. मात्र यांनी काही ऐकलं नाही. २५ वर्षात युती सडली म्हणता पण यांनी तर अडीच वर्षात शिवसेना संपवली. असाही आरोप रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसेनेत फूट पडली ही मुळीच चांगली बाब नाही

शिवसेनेत फूट पडली ही चांगली गोष्ट नाही. शरद पवारांना जे बाळासाहेब ठाकरे असताना जमलं नाही ते त्यांनी आत्ता करून दाखवलं. शरद पवारांचा शिवसेना फोडण्याचा डाव यशस्वी झाला. मात्र आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक जिवंत आहोत. मी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार. भविष्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आमची शिवसेना कशी उभी राहिल ते बघणार. उद्धवजी तेल लावलेला पैलवान स्वतःचा पक्ष सोडून शिवसेनेचं भलं करणार आहे का? उद्धव ठाकरेंनी हे ओळखलं पाहिजे. त्यांच्या भोवती बसणारे लोक राष्ट्रवादीसाठी काम करत आहेत हेदेखील त्यांनी ओळखायला हवं. मी आत्ता त्यांची नावं घेत नाही मात्र वेळ आल्यावर ती नावंही जाहीर करणार आहे असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे

गद्दारी आणि बेईमानी आमच्या रक्तात नाही-रामदास कदम

मी शिवसेनेत ५२ वर्षे सक्रिय आहे. जेव्हा छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी पुढे सरसावून शिवसेना वाचवली. नारायण राणे, राज ठाकरे हे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा छातीचा कोट करून मी उभा होतो, शिवसेना फुटू नये काही चुकीचं घडू नये म्हणून मी योगदान दिलं आहे. राज्यात दंगली झाल्यानंतर पोहचणारा रामदास कदम होता. शिवसेनेसाठी मी संघर्ष केला आहे. मी सोमवारी राजीनामा दिला त्यानंतर माझी हकालपट्टी झाली. त्याचा प्रश्नच कुठे येतो? असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, गद्दारी आणि बेईमानी आमच्या रक्तात नाही. मात्र अनिल परब आणि त्याच्यासारखे कोंडाळं करून उद्धव ठाकरेंसोबत बसलेले लोक हे उरलीसुरली शिवसेनाही संपवतील. मागच्या दोन वर्षात आमदार योगेश कदम यांना प्रचंड त्रास दिला. उद्धव ठाकरेंच्या कानात जाऊन अनिल परब गोष्टी सांगायच्या. त्यानंतर पुढे तसंच सगळं घडायचं. एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. जर हे पाऊल एकनाथ शिंदे यांनी उचललं नसतं तर पुढच्या विधानसभेला शिवसेनेचे दहा आमदारही निवडून आले नसते असंही वक्तव्य रामदास कदम यांनी केलं आहे. तसंच राष्ट्रवादीची साथ सोडा असंही रामदास कदम यांनी सुचवलं आहे.

    follow whatsapp