राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना आज सत्र न्यायालयाने दिलासा दिलेला नाहीये. 22 तारखेच्या आत आम्हाला कामावर रुजू व्हायचंय हे कारण देऊन जामीनासाठी अर्ज केलेल्या एसटी कामकारांच्या पदरी आजही निराशाच पडली आहे. सेशन्स कोर्टाने आज यावर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणात आज गावदेवी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर प्रकाश सावंत यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरु होतं. परंतू विशेष सरकारी वकील प्रदीप घरत हे दुसऱ्या प्रकरणात व्यस्त असल्यामुळे सरकारी वकील अभिजीत गोंडवल यांनी न्यायालयाकडे वेळ वाढवून मागितला. ज्यानंतर सेशन्स कोर्टाचे जज आर.एस.सदरानी या प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या वकीलांनी युक्तीवाद करताना कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हायचं आहे. या प्रकरणात त्यांचा सहभाग अद्याप स्पष्ट व्हायचा आहे असं सांगितलं. या युक्तीवादावर बोलत असताना न्यायमूर्ती आर.एम. सदरानी यांनी प्रश्न उपस्थित करताना, “आरोपी तुरुंगात आहेत आणि त्यांचा जामीनही फेटाळला गेला आहे तर ते पुन्हा सेवेत कसे रुजू होऊ शकतात”, असं विचारत जामीन अर्जावर सूनावणी करण्यास नकार दिला.
एप्रिल महिन्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निर्णय देताना मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकीलांनी जामीन अर्जाला विरोध करत या प्रकरणातली सुनावणी अद्याप सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या तपासातून पोलिसांना एसटी कर्मचारी आणखी मंत्र्यांच्या घरावर हल्ला करण्याच्या तयारीत होते असं सांगितलं.
अटकेतील सर्व कर्मचाऱ्यांचा पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात सहभाग होता. या सर्व कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी ठेवणं शक्य नसल्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अजुनही अनेक कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवणं सुरु असल्याचं म्हणत सरकारी वकीलांनी कर्मचाऱ्यांना जामीन अर्जाला विरोध केला.
दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आपण गरीब आणि मध्यमवर्गीय घरातून आल्याचं सांगत आपली कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं कोर्टाला सांगितलं. परंतू कोर्टाने आज या कर्मचाऱ्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही.
ADVERTISEMENT