मनीष जोग, जळगाव
ADVERTISEMENT
आपल्या कोंबडीच्या पिल्लू मांजरीने खाऊन टाकलं या रागातून एका माथेफिरू व्यक्तीने थेट गोळी घालून मांजरीची हत्या केल्याची घटना जळगावात घडली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्दयी माथेफिरूने केलेल्या कृत्याचा सर्वत्र निषेध केला जात असून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरी विठ्ठल नगर भागात राहणारे पुष्कराज बानाईत हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. परिसरात असलेल्या भटक्या मांजरीचे ते संगोपन करतात. दरम्यान, बानाईत यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने अनेक कोंबड्या पाळल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच बानाईत यांच्याकडील एका मांजरीने शेजारीच असलेल्या एक कोंबडीचं पिल्लू खाऊन टाकलं. या प्रकारने बानाईत यांचा शेजारी प्रचंड संतापला.
आपल्या कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याने बानाईत यांच्या बाजूला राहणाऱ्या माथेफिरूने छर्रे असलेल्या बंदुकीने थेट मांजरीच्या कपाळावरच निशाणा साधला. शेजाऱ्याने झाडलेल्या गोळीचा नेम मांजरीच्या अचूक लागला आणि त्यातच तिचा जीव गेला.
माथेफिरूने झाडलेली छऱ्याची गोळी ही थेट मांजरीच्या कपाळावरच जाऊन लागली होती. ज्यामुळे मांजरीचा तडफडून मृत्यू झाला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैदही झाला आहे. त्यामुळे आता त्याचा व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरला झाला आहे. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर अनेक प्राणी प्रेमींकडून माथेफिरुविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
दरम्यान, याप्रकरणी अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस स्वत:हून याप्रकरणी काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मांजरीचं शेपूट कापल्याप्रकरणी थेट मुंबईच्या पोलीस ठाण्यात तक्रार
मांजरीचं शेपूट कापल्याप्रकरणी थेट मुंबईच्या पोलीस ठाण्यात तक्रार
काही दिवसांपूर्वीच मुंबईतील मालाडमध्ये एका भटक्या मांजरीची शेपटी कापण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
कोणीतरी अज्ञात इसमाने मांजरीची शेपटी अत्यंत धारदार वस्तूने कापल्याचं कळाल्याने अजय रमेश शहा या व्यक्तीने या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली होती. साधारण २ वर्षे वयाच्या मांजरीसोबत झालेला हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे अज्ञात इसमाला शोधून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहा यांनी आपल्या तक्रारीत केली होती.
दरम्यान, अशा विकृत नागरिकांना कठोर शासन केलं जावं अशी मागणी सातत्याने प्राणी प्रेमी संघटनांकडून केली जात आहे.
ADVERTISEMENT