New India Cooperative Bank News : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (EOW) न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी एका व्यावसायिकाच्या मुलाला अटक केल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी या प्रकरणातील फरार आरोपी उन्नाथन अरुणाचलमचा मुलगा मनोहर अरुणाचलम (33) याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत झालेली ही चौथी अटक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर अरुणाचलम हा चार्टर्ड अकाउंटन्सीचा अभ्यास करत असून, मालाडमध्ये 'मॅगस कन्सल्टन्सी' नावाची फर्म देखील चालवतो.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरण: तरुणीसोबत नेमकं काय घडलं? कोर्टातील A टू Z युक्तिवाद!
गुरुवारी संध्याकाळी, आर्थिक गुन्हे शाखेनं उन्नाथन अरुणाचलम उर्फ अरुण याच्याविरुद्ध नोटीस जारी केली आणि त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं. उन्नतनवर गैरव्यवहार केलेल्या रकमेतून 40 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. आरोपी उन्नाथन देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून त्याच्याविरुद्ध लूकआउट सर्क्युलर देखील जारी करण्यात आला आहे.
मुलानं बापाला फरार होण्यास केली मदत
मनोहरने त्याच्या वडिलांना पळून जाण्यास मदत केल्याचं तपासात उघड झालं आहे. तपासात असंही समोर आलं आहे की, जेव्हा उन्नाथन अरुणाचलम फरार झाला तेव्हा मनोहर त्याच्यासोबत होता. EOW अधिकाऱ्ंयाच्या मते, उन्नाथन अनेकदा मॅगस कन्सल्टन्सीच्या कार्यालयात बसायचा. अटक केलेले न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे जनरल मॅनेजर आणि अकाउंट्स प्रमुख हितेश मेहता हे या कार्यालयात त्यांना दोनदा भेटायला आले होते.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हितेश मेहता यांनी मे 2019 मध्ये अरुण भाईंना 15 कोटी रुपये रोख आणि ऑगस्ट 2019 मध्ये 18 कोटी रुपये रोख त्याच कार्यालयात सुपूर्द केले होते. या व्यवहारांदरम्यान मनोहर देखील उपस्थित होते. 17 फेब्रुवारी रोजी मनोहरला त्याच्या वडिलांसोबत त्याच्या घराजवळ पाहिले गेले. यानंतर, उन्नथन एका ऑटो रिक्षात बसून बोरिवलीकडे जाताना दिसला.
दहिसरमधून अटक, 4 मार्चपर्यंत पोलिस कोठडी
हे ही वाचा >>आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला? पोलिसांना नेमका काय संशय? स्वारगेट प्रकरणात नेमकं काय समोर आलं?
पोलिसांनी उत्तर मुंबईतील दहिसर भागातून मनोहर अरुणाचलमला अटक केली. न्यायालयानं त्याला 4 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
RBI च्या चौकशीत घोटाळा उघड
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील हा घोटाळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकेच्या रोख तिजोरीची तपासणी केली तेव्हा उघडकीस आला. यानंतर, दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, नंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. आतापर्यंत, आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात मुख्य आरोपी हितेश मेहता, बँकेचे माजी सीईओ अभिमन्यू आणि रिअल इस्टेट डेव्हलपर धर्मेश पौण यांना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
