दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. सगळा देश दिवाळीच्या सेलिब्रेशनसाठी सज्ज झाला आहे. अशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोना वाढू लागल्याने महाराष्ट्र, केरळ या राज्यांनी अॅडव्हायजरीही लागू केली आहे. तसंच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत मागच्या दिवसांपासून वाढ पाहण्यास मिळते आहे. दिल्लीत १६ ऑक्टोबरला १.५९ पॉझिटिव्हिटी रेट सह ११५ नवे रूग्ण आढळले होते. तर शनिवारी २.१२ पॉझिटिव्हिटी रेटसर १३५ नवे रूग्ण आढळले होते.
ADVERTISEMENT
दिल्लीत ४२९ सक्रिय कोरोना रूग्ण
दिल्लीत सध्याच्या घडीला ४२९ सक्रिया कोरोना रूग्ण आहेत. त्यातले ३२९ रूग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत. असं सगळं असतानाच कोरोनाचा नवा व्हेरिएंट भारतात आढळला आहे.याचा फैलाव देशभरात चार आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
काय आहे ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट?
ओमिक्रॉन या व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचं नाव BA.5.1.7 असं आहे. आरोग्य तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे की हा व्हेरिएंट गेल्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरणारा आहे. जर निष्काळजीपणा केला तर हा व्हेरिएंट वेगाने पसरू शकतो. तसंच या व्हेरिएंटचा फैलाव झाला तर कोरोनाचे रूग्ण वाढण्याची शक्यता आहे.
भारतात BF.7 हा व्हेरिएंट गुजरातमध्ये आढळला
गुजरातच्या बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये भारतातल्या BF.7 सब व्हेरिएंटचा शोध लागला. चीनमध्ये कोरोनाची जे रूग्ण वाढत आहेत त्याचं मुख्य कारण BF.7 आणि BA.5.1.7 हे दोन व्हेरिएंट आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि बेल्जियम या देशातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची प्रकरणं समोर आली आहेत.
आरोग्य तज्ज्ञांनी काय म्हटलं आहे सब व्हेरिएंटबाबत?
आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवा व्हेरिएंट लस घेतलेल्यांना आणि चांगली प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांनाही संक्रमित करू शकतो. सध्या देशात दिवाळी हा सर्वात मोठा सण आला आहे. त्यामुळे बाजरपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. अशात थंडीही पडू लागली आहे. या काळातलं वातावरण हे व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटसाठी चांगलंच पोषक आहे. मास्क लावणं सोडू नका अन्यथा व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
नव्या व्हायरस व्हेरिएंटची लक्षणं काय आहेत?
NTAGI चे चेअरमन डॉ. एन. के. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हेरिएंटची लक्षणंही कोव्हिड १९ च्या इतर लक्षणांप्रमाणेच आहेत. अंगदुखी हे या व्हायरसचं सर्वात प्रमुख लक्षण आहे असंही अरोरा यांनी सांगितलं. कुणालाही जर दीर्घ काळापासून अंगदुखी होत असेल तर त्या व्यक्तीने तातडीने कोविड टेस्ट करावी. तसंच घसा खवखवणे, थकवा येणं, कफ आणि वाहतं नाक ही देखील या व्हेरिएंटची लक्षणं आहेत.
३ ते ४ आठवड्यात भारतात या व्हेरिएंटचा फैलाव शक्य
डॉ. अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार जर निष्काळजीपणा केला तर कोरोनाच्या व्हायरसचा हा सब व्हेरिएंट भारतात ४ आठवड्यात पसरू शकतो. सध्या दिवाळी आहे त्यामुळे गर्दीने बाजारपेठा फुलल्या आहेत. लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. अशात थंडीचा मोसम असल्याने फ्लू देखील पसरतो आहे. अशा सगळ्यात जर कुणाला अंगदुखी आणि इतर लक्षणं आढळली तर त्यांनी टेस्ट करणं आवश्यक आहे.
ADVERTISEMENT