बीड जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालून माघारी निघालेल्या महसूल पथकाच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तहसीलदारांसह अन्य एकजण गंभीर जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT
चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. या अपघातात मंडळ अधिकारी नितीन तुकाराम जाधव (वय ४०, रा. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्यासह अन्य एक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवरील सावळेश्वर फाट्यावर रविवारी (दि.०६) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडला.
गेवराई तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक होत आहे. हा अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाने पथकं स्थापन केली आहेत. शनिवारी रात्रीपासून बीडचे प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके व म्हाळस जवळा (ता.बीड) येथील मंडळ अधिकारी नितीन जाधव यांचे पथक खासगी ब्रेझा कारमधून (एमएच २३ एडी ४४३५) राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी शनिवारी रात्री गस्त घालत होते.
गस्त घालून ते राक्षसभुवनकडून राष्ट्रीय महामार्गाकडे निघाले असता, वळणावर चालकाचे ब्रेझा कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली उतरून निलगिरीच्या झाडाला धडकली. या अपघातात मंडळ अधिकारी नितीन जाधव जागीच ठार झाले. तर तहसीलदार डोके आणि जाधव यांचा पुतण्या सोनू हे गंभीर जखमी झाले. तहसीलदार डोके यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.
अपघात मृत्यू झालेले मंडळ अधिकारी नितीन जाधव हे राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मुंबई प्रदेश सचिवपदी नियुक्त होते. महसूल कर्मचाऱ्यांमध्ये त्यांचा दांडगा संपर्क होता. काही काळ त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे स्वीय सहायक म्हणून कामही केले होते.
ADVERTISEMENT