पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशातले सगळे विरोधक एकवटले आहेत. सगळ्या विरोधकांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन दिवशी झालेल्या हिंसाचाराचा निषेध करणारं हे पत्र आहे. मात्र आश्चर्याची बाब ही आहे की मोदींच्या विरोधात बोलण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना या सगळ्यात सहभागी नाही.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे पत्रात?
आम्ही सगळे राजकीय नेते मिळून तुम्हाला हे आवाहन करतो आहोत. अन्न, वस्त्र, निवारा, श्रद्धा, सण, भाषा या सगळ्याचा वापर करून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक आपल्या सोसायटीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
तिरस्कार पसरेल अशी भाषणं करणाऱ्यांना सत्ताधारी आश्रय देत आहेत असंच चित्र दिसत आहे. तसंच सर्वात धक्कादायक बाब ही आहे की या सगळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौन फारच क्लेशदायक आहे. रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन दिवशी देशात जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहोत.
ज्या काही घटना देशात घडल्या त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन हे जास्त धक्कादायक आहे. सोशल मीडिया आणि इतर सर्व सार्वजनिक मंचांवर ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्यामुळे अतीव दुःख झालं आहे असंही विरोधकांनी म्हटलं आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपिल करतो आहोत की समाजातल्या सर्व स्तरांमधल्या लोकांमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यावर लक्ष केंद्रीत करा. देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि देश एकसंध राहण्यासाठी आम्हीही तुमच्यासोबतच आहोत असं म्हणत हे पत्र लिहिण्यात आलं आहे.
सोनिया गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी, एम. के. स्टॅलिन, हेमंत सोरेन, फारूख अब्दुल्ला, तेजस्वी यादव, देबब्रत विश्वास, दीपांकर भट्टाचार्य या सगळ्यांची नावं या पत्रात आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांचं नाव नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त होतं आहे. एरवी मोदींच्या विरोधात बोलण्याची एकही संधी न सोडणारी शिवसेना या मुद्द्यावर बॅकफूटवर आली आहे.
शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेससोबत हातमिळवणी केली आहे. तसंच केंद्रातूनही शिवसेना बाहेर पडली आहे. तरीही जे पत्र विरोधकांनी सरकारच्या विरोधात लिहिलं आहे त्यातून शिवसेनेने स्वतःला सोयीस्कररित्या बाजूला ठेवलं आहे. उद्धव ठाकरे यांचं या पत्रात नावही नाही हेच दिसून येतं आहे. त्यामुळे आता विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
ADVERTISEMENT