डॉ. राजेश गायकवाड
ADVERTISEMENT
१ ऑगस्ट हा दिवस भारतात सर्वत्र मौखिक स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे डॉ. गोविंद ब शंकवळकर यांची पुण्यतिथी. मौखिक आरोग्यविषयी जनजागृती करणे हे या दिवसाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. भारत हा एक विकसनशील देश असल्यामुळे बहुतांशी लोकसंख्या ग्रामीण भागात स्थायिक आहे आणि अजूनही भारतातील ग्रामीण भागात अद्यापही लोक मशेरी, तंबाखू इत्यादी वस्तूंचा वापर दात साफ करण्यासाठी करताना दिसतात.
भारतात अजूनही द्वितीय व तृतीय प्रतिबंधात्मक आरोग्य सेवांवर जास्त भर दिला जातो. म्हणून जनमानसात मौखिक आरोग्यविषयक जनजागृती करणे अतिशय महत्वाचे आहे. याच कारणास्तव मौखिक स्वच्छता दिन देशभरातील विविध दंत महाविद्यालयांमध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी भारतीय दंत परिषद व इंडियन सोसायटी ऑफ पेरीओडोंटोलॉजी तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते तसेच सगळ्यात उत्तम कार्यक्रमाचे नियोजन करण्याऱ्या दंत महाविद्यालयाला पारितोषिक दिले जाते.
मागील वर्षापासून कोरोनाच्या महामारीने अवघ्या जगाला ग्रासलेले आहे. तसेच यावर्षी करोना झालेल्या रुग्णांमध्ये म्युकॉरमायकोसिस या रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून आली. या रोगाला वेळीच आळा घालण्यासाठी आपल्या मौखिक आरोग्याची काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
भारतामध्ये करोना विषाणूच्या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये म्युकॉरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी या रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणास्तव म्युकॉरमायकोसिस हा साथीचा रोग म्हणून महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये घोषित करण्यात आला आहे. म्युकॉरमायकोसिस हा बुरशीजन्य गंभीर आजार असून, याचे तात्काळ निवारण करून उपचार सुरू करणे अनिवार्य आहे. या आजाराचा संसर्ग नाक, कान, घसा, जबडा आणि दात या पासून सुरू होऊन डोळे आणि मेंदू पर्यंत पोहचून दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. याचकरणास्तव आज आपण या आजाराची लक्षणे तसेच यावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती करून घेऊया.
हा आजार कोणाला होऊ शकतो?
करोना झालेल्या प्रत्येक व्यक्तीला हा आजार होत नाही, त्यामुळे या आजाराची भीती मनातून काढून टाकून यावर मात करण्याचे उपाय समजून घेतले पाहिजेत. करोना झालेल्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारशक्ती अगोदरच कमी झालेली असते त्यामुळे अश्या रुग्णांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त दिसून येते. तसेच मधुमेह असलेल्या लोकांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त असण्याचे कारण म्हणजे शरीरातील वाढलेली साखर आणि कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती. बुरशीजन्य असलेला हा रोग मधुमेही व्यक्तींच्या शरीरातील वाढलेल्या साखरेच्या आधारावर सर्वत्र शरीरात फैलाव करतो. करोना रुग्णांची प्रतिकारप्रणाली स्टीरॉइड्स तसेच टोसिलीझुमॅबमुळे आणखी दबली जाते. त्याचप्रमाणे कृत्रिम श्वासोच्छवास मशीनच्या अतिवापरामुळे व प्राणवायूच्या प्रमाणाबाहेरील वापरामुळे करोना बाधित रुग्णांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसते.
या रोगाची लक्षणे कोणती?
या रोगाची सुरूवात नाकाच्या वरच्या बाजूवर कपाळाखाली किंवा तोंडामध्ये टाळ्यावर काळे व्रण दिसण्यापासून होते आणि काही काळातच हा रोग रौद्र रूप धरण करतो. या रोगात प्रामुख्याने चेहऱ्याचे स्नायू दुखणे, अर्धशिशी, नाक चोंदणे, नाकाला सूज येणे, नाकपुडीतून रक्तस्त्राव होणे, चेहरा व डोळ्यांना सूज येणे , दात दुखणे व हलू लागणे यासारखी अनेक लक्षणे दिसतात. परंतु प्राथमिक स्थितीमध्येच या रोगाची लक्षणे ओळखून तातडीने आपल्या जवळील इस्पितळात जाऊन उपचार चालू केल्यास, हा रोग कायमची हानी होण्याआधी रोखला जाऊ शकतो.
हा आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल?
सगळ्यात प्रथम मधुमेही व्यक्तींनी शरीरातील वाढलेल्या साखरेला नियंत्रणात आणावे, जेणेकरून या रोगाचा शरीरात इतरत्र होणारा फैलाव आटोक्यात येइल. याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईडसचे प्रमाण कमी व अधिक करू नये. तसेच डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त दिवस स्टेरॉईडस घेऊ नये. हा रोग दमट वातावरणात जास्त वेगाने पसरतो. त्यामुळे मास्क व टूथब्रश वारंवार बदलत रहावे.
साधारणतः बुरशी वाढण्याचे प्रमाण घरातील तसेच परिसरातील अस्वच्छ ठिकाणी सगळ्यात जास्त आढळून येते. त्याचमूळे आपल्या शारीरिक तसेच मौखिक आरोग्याची स्वच्छता राखणे ही काळाची गरजच बनली आहे. आपले तोंड अनेक सूक्ष्मजीवांचे घर असून त्यामुळे दात आणि हिरड्यांवर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची घाण जमा होते. याचकारणास्तव मौखिक आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी दिवसातून दोन वेळ ब्रश करणे तसेच पोवीडॉन आयोडीन किंवा क्लोरहेक्सीडीन यांसारख्या माऊथवॉशचा वापर आपल्या दैनंदिन सवयीमध्ये ठेवावा. हिरड्या तसेच जीभ, गाल, घसा इत्यादी ठिकाणी काले डागे आढळून आल्यास घाबरून न जाता सर्वात आधी आपल्या जवळच्या रुग्णालयात जावे व तातडीने उपचार चालू करावे.
हा आजार झाल्यास कोणते उपचार करावेत?
या रोगाची लक्षणे आढळून आल्यास सर्वात प्रथम त्या रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या, आजार असलेल्या भागाचे सिटीस्कॅन/ एमआरआय केले जातात. या रोगामुळे नाकात निर्माण होणाऱ्या द्रावाची किंवा राखाडी रंगाच्या पापुद्र्याची शक्य असल्यास सूक्ष्मदर्शकाखाली तपासण्या केल्या जातात आणि निदान पक्के केले जाते. रुग्णाला तात्काळ अॅाम्फोटेरीसिन-बी हे इंजेक्शन दिले जाते.
स्कॅनवरील निदानाप्रमाणे या आजाराने व्याप्त असलेल्या नाकाच्या हाडांची, सायनसेसची आणि डोळ्याची शस्त्रक्रिया करून अंतर्गत भागात निर्माण झालेली बुरशी साफ केली जाते. आजार जास्त पसरलेला असल्यास आणि हाडांमध्ये गेला असल्यास ती हाडं शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकली जातात. डोळ्याच्या बाबतीतही आजार डोळ्यामध्ये पसरला आहे असे दिसल्यास डोळाही खोबणीतून काढला जातो. या रुग्णावर नाक-कान-घशाच्या, डोळ्याच्या आणि दंतशल्यशास्त्र शाखेच्या विशेषज्ञ डॉक्टरांची टीम शस्त्रक्रिया आणि उपचार करते. नजीकच्या काळात अशा रुग्णांमध्ये काढून टाकलेल्या भागाचे प्रोस्थेटीक रीहॅबिलिटेशन म्हणजेच कृत्रिम पुनर्वसन करण्यावर भर देणे गरजेचे बनेल. कोणताही आजार काही पाऊलखुणा सोडून जात असतो. तशा पद्धतीचाच हा आजार आहे. त्यामुळे या रोगाचे निदान लवकरात लवकर करून योग्य ती उपाययोजना करण्याकडे आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा भर आहे. प्रत्येक रूग्णाने यासाठी आपले मौखिक तसेच शारीरिक आरोग्य स्वस्थ ठेवावे व या रोगावर मात करावी.
( डॉ. राजेश गायकवाड हे मुंबईच्या गर्व्हमेंट डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. Department of Periodontics and Dental Hygienists या विभागाचे प्रमुख आहेत.)
ADVERTISEMENT