महाराष्ट्रातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर गुरुवारी सायंकाळी काढण्यात आली. या आदेशात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची देखील बदली झाली आहे. कौस्तुभ दिवेगावकर यांची बाळासाहेब ठाकरे,कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प संचालक म्हणून बदली झाली आहे. त्यांना साईड पोस्ट देण्यात आली आहे. याच्या मागे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली आहे. मागच्या महिन्यात तानाजी सावंत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यात वादाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यामुळेच की काय कौस्तुभ दिवेगावकर यांना साईड पोस्ट देण्यात आलीय, असं बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
नेमकं काय आहे प्रकरण?
तानाजी सावंत यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सोमनाथ रेड्डी यांना कौस्तुभ दिवेगावकर यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला होता. रेड्डी यांनी तसं लेखी सावंत यांना कळवलं होतं. यावरून तानाजी सावंत यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे दिवेगावकर यांची तक्रार केली होती. त्यामुळे सावंत आणि दिवेगावकर यांच्यातील कलह समोर आला होता. यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मात्र मौन बाळगला होता.
परस्पर माहिती घेतल्याने दिवेगावकरांचा होता आक्षेप
सोमनाथ रेड्डी यांची तानाजी सावंत यांच्या खात्याचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. रेड्डी यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या परस्पर बेकायदेशीर माहिती संकलित केली. ज्याला कौस्तुभ दिवेगावकर यांचा आक्षेप होता, असं बोललं जातंय. रेड्डीनी डीपीडीसीअंतर्गत जी कामं आहेत, त्याची माहिती घेतली. इतर कामांचा आढावा घेतला, हे करण्याची एक कायदेशीर पद्धत आहे, त्यानुसार माहिती न घेतल्याने दिवेगावकर यांचा आक्षेप होता.
संवेदनशील अधिकारी म्हणून ओळख
कौस्तुभ दिवेगावकर एक संवेदनशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं चांगलंच कौतुक झालं होतं. शिवाय ते आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी वाचन, पुस्तक तसेच अन्य सामाजिक मुद्द्यांवर बोट ठेवत असतात. मराठी साहित्य हा विषय घेऊन दिवेगावकर यांनी UPSC मध्ये रेकॉर्डब्रेक मार्क मिळवले होते. यासह शेतकऱ्यांचा कलेक्टर म्हणून देखील त्यांची ओळख निर्माण झाली होती.
बदलीनंतर काय म्हणाले दिवेगावकर?
उस्मानाबादच्या लोकांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामासाठी मला नावाजले. खूप प्रेम दिले. शेतकऱ्याचा हक्काचा कलेक्टर झालो. अजून काय हवे? खूप आभार ! ता. क. मी सेलिब्रिटी नाही. आणि व्हायची इच्छाही नाही. पण काल रात्रीपासून जो प्रेमाचा वर्षाव आपण केलात त्याचा मी आनंदाने आणि नम्रपणे स्वीकार करत आहे. इतकी माणसे जोडली जातात याचे अप्रूप वाटते. पाय जमिनीवर राहावेत हेच मागणे. पुन्हा एकदा धन्यवाद, असं दिवेगावकर म्हणाले. कृषी क्षेत्रात काम करता येईल यात समाधान आहे, असं देखील ते म्हणाले.
ADVERTISEMENT